कोल्हापूर : सध्या देश धर्म मूलतत्त्ववादी, जातीयवादी, मनुवादी अशा वातावरणातून जात आहे. सध्याचे राज्यकर्ते महात्मा गांधीजींना कवेत घेतल्याचे दाखवितात; परंतु त्यांनी देशात धर्मांधतेचे वातावरण निर्माण केले आहे. अशा काळात मानवधर्माचा जागर करणारा प्रखर नेता म्हणून ‘एन. डी.’ यांना दीर्घायुष्य लाभावे, असे प्रतिपादन नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी रविवारी येथे केले. याच कार्यक्रमात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नेटाने चालविलेल्या कार्याबद्दल ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली.महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे भाई एन. डी. पाटील यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त शाहू स्मारक भवनात कृतज्ञता सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. प्रमुख उपस्थिती सरोज पाटील, शे. का. पक्षाचे आमदार जयंत पाटील, साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, ‘अंनिस’च्या विश्वस्त डॉ. शैला दाभोलकर, राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, आदींची होती.कृतज्ञता सोहळ्यात मेधा पाटकर यांच्या हस्ते प्रा. एन. डी. पाटील यांचा मानपत्र, शाल, स्मृतिचिन्ह व भारतीय संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला.पाटकर म्हणाल्या, फुले, शाहू यांची विचारधारा व महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहाचा आचार अमलात आणून, नव्याने रणनीती आखून चळवळींना एन. डी. पाटील यांनी बळ दिले. मूल्यहीनतेवर आजचे राजकारण सुरू असून, लोकशाहीची गटारगंगा होत आहे. अशा स्थितीतही ‘एन.डी.’ कधीही एकटे पडले नाहीत. उलट ते हिमतीने सामोरे जात राहून दुर्बलांसह सर्वांचे नेते बनले.एन. डी. पाटील यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सरकारने ज्या ५७८ गावांत शाळा काढल्या नाहीत, तेथे ‘रयत’च्या माध्यमातून शाळा काढून ग्रामीण भागात शिक्षणाचा पाया रचण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले.सरोज पाटील म्हणाल्या, जात-धर्म पाळायचा नाही, मुलगा-मुलगी भेदभाव करायचा नाही, अशी शिकवण लहानपणापासूनच आईवडिलांनी आपल्याला दिली. यावेळी शे. का. पक्षाचे आमदार जयंत पाटील, लक्ष्मीकांत देशमुख, शैला दाभोलकर, आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रा. एकनाथ पाटील यांनी मानपत्र वाचन केले.प्रत्येकाला ‘एन. डी.’ हवेतविविध चळवळींमध्ये ‘एन.डी.’ आपल्याला हवेत, असे म्हणणारे नेते आहेत. ‘एन.डीं.’मुळेच एन्रॉनविरोधी चळवळ अधिक प्रखर होण्यास मदत झाली. जल, जंगल व जमिनीसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘एन.डीं.’च्या बुलंद कर्तृत्वाने बळ दिल्याचे मेधा पाटकर यांनी सांगितले.बुद्धिजीवी व श्रमजीवींनाएकत्र बांधलेबुद्धिजीवी व श्रमजीवी घटकांना विवेकाच्या जागरातून एकत्र बांधण्याचे काम ‘एन.डीं.’नी केल्याने चळवळींना गती येण्यास मदत झाली. त्यामुळे जातीयवाद, अंधश्रद्धा, भांडवलदारी, धर्मभेद, बाजारूपणा अशा अनिष्ट बाबी उखडून टाकण्यासाठी चळवळींसाठी ‘एन.डी.’ हे मूर्तिमंत उदाहरण असल्याचे पाटकर यांनी सांगितले.कर्मवीरांची वाटचालशाहूंच्या विचारांनीमहात्मा फुले यांचा सामाजिक वारसा हा राजर्षी शाहू महाराजांनी चालविला. पुढे शाहूंचा हा वारसा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी चालवून महाराष्टÑाला प्रगतीवर नेण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे प्रा. एन. डी. पाटील यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांचा शुभेच्छा संदेशया कृतज्ञता सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना शुभेच्छा संदेश पाठविला. त्याचे वाचन करण्यात आले.दाभोलकरांनी तयार केलेल्या पिढीचा महाराष्टÑाला आधारडॉ. दाभोलकरांनी तयार केलेल्या आजच्या पिढीने झोकून देऊन आपले काम सुरू ठेवत महाराष्टÑाला आधार देण्याचे काम केल्याचे गौरवोद्गार प्रा. एन. डी. पाटील यांनी काढले.चळवळींचे महत्त्व‘एन.डीं.’नी दाखवून दिलेशोषित, पीडितांच्या प्रश्नांवर आयुष्यभर संघर्ष करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे एन. डी. पाटील आहेत. चळवळी करणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी दाखवून दिल्याचे लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले.‘एन.डी.’, दाभोलकरांची किमया इतरांनीहीसाध्य करावीविवेकाच्या वाटचालीसाठी अशक्य असे काहीच नाही, असे समजून काम करावे. एन. डी. पाटील व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी मेंदूचा वापर करून अंधश्रद्धा निर्मूलनाची किमया केली, ती आपण प्रत्येकजण का करू शकत नाही? असा सवाल डॉ. शैला दाभोलकर यांनी उपस्थित केला.आत्मपरीक्षणाची गरज : सध्या परिवर्तनवादी चळवळीत काम करणाºयांवर आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. परिवर्तनवादी कार्यकर्त्यांचे विविध पातळ्यांवर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे; मात्र त्यांच्यामध्ये ऐक्य नाही. त्यामुळे परिवर्तनवादी लोकांनी एकत्र येऊन अविवेकाविरोधात लढा दिला पाहिजे, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले.दाभोलकर-पानसरे तपास-प्रकरणी दु:खी : दाभोलकर-पानसरे यांच्या हत्येचा तपास योग्य रीतीने होत नाही, याबद्दल दु:ख वाटत असल्याचे सांगून या प्रकरणी दबाव निर्माण करण्यात आपण सर्वजण अपयशी ठरल्याबद्दलही दु:ख होत असल्याचे शे. का. पक्षाचेआमदार जयंत पाटील यांनी सांगितले.‘एन.डीं.’ची कामगिरी विधिमंडळ विसरू शकत नाही: विधिमंडळामध्ये कायद्यात बदल करायला लावणारी एन. डी. पाटील यांची कामगिरी आजही संपूर्ण विधिमंडळ विसरू शकत नाही, असे सांगून आमची संख्या जरी कमी असली तरी एखादा निर्णय बदलण्याची ताकद आम्हाला ‘एन.डीं.’मुळे मिळाल्याचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.‘एन.डीं.’च्या शाळेला ५१ हजारांची भेट : या कार्यक्रमात एन. डी. पाटील यांच्या ढवळी येथील शाळेसाठी एका व्यक्तीने ५१ हजारांची मदत जाहीर करून ती व्यासपीठावर येऊन त्यांच्याकडे सुपूर्द केली.विवेकवादाच्या विजयासाठी प्रयत्नशील : विवेकवादाच्या मार्गावरून चालणाºयांना आयुष्यभर यातना सोसाव्या लागतात. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना सोसाव्या लागणाºया यातना अधिक असतात. त्यामुळे विवेकवादाचा विजय होईल या धारणेने आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे डॉ. तारा भवाळकर यांनी सांगितले.‘एन.डीं.’चे स्थळ आणि निनावी पत्रेआपल्याला एन. डी. पाटील यांचे स्थळ येऊन लग्न ठरल्यानंतर आमच्या घरी चार ते पाच निनावी पत्रे आली. ‘एकवेळ मुलीला विहिरीत ढकला; पण नारायणला मुलगी देऊ नका’, ‘नारायण साखळदंडातूनही पळून जाईल’, ‘त्याची परिस्थिती चांगली नाही; तो भाड्याने राहतो,’ असे उल्लेख या पत्रांमध्ये होते; परंतु आमच्या घरचे ठाम राहिले, असे सरोज पाटील यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले.
‘एन. डी.’ मानव धर्माचा जागर करणारे नेते: मेधा पाटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 1:10 AM