कोल्हापूर : गेली सात दशके रस्त्यांवर संघर्ष करणारे, संघर्षाचा अग्निकुंड, शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे आज सोमवारी निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी कोल्हापुरात अखेरचा श्वास घेतला. शेतकरी, कामगार व शोषित जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचलेला नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने सामाजिक, राजकीय तसेच सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.प्रा. एन. डी. पाटील सर यांच्यावर उद्या, मंगळवारी कोल्हापुरातच अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याआधी त्यांचे पार्थीव अत्यंदर्शनासाठी कदमवाडी परिसरातील शाहू कॉलेज येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पंचगंगा स्मशानभूमी येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. तर कोरोना नियमाचे पालन करत २५ मान्यवरांच्या उपस्थितीतच पंचगंगा स्मशानभूमी येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाची बातमी समजताच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी.एन.पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, मेघा पानसरे, संभाजी जगदाळे, मंजुश्री पवार, बळी पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी एन. डी. पाटील यांचे अंतिम दर्शन घेतले.महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेतृत्व असलेल्या प्रा. एन. डी. पाटील यांची प्रकृती काल, रविवारी अत्यंत गंभीर बनली होती. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण त्यांची प्रकृती उपचारास फारसा प्रतिसाद देत नव्हती. अखेर उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.
N. D. Patil Passed Away : संघर्षाचा अग्निकुंड शांत झाला, कोल्हापुरात उद्या होणार अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 1:04 PM