‘नॅक‘ तयारीअंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या तयारीचा आढावा सोमवारी सकाळी ९ ते दुपारी २पर्यंत अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने घेण्यात आला. त्यानंतर दुपारी ३ वाजल्यापासून कुलगुरू डॉ. शिर्के आणि विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत यांनी मानव्यशास्त्र इमारत, वि. स. खांडेकर भाषाभवनमधील विविध अधिविभाग, तर विद्यार्थी भवनाला भेट दिली. प्र-कुलगुरू डॉ. पाटील आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. एम. एस. देशमुख यांनी विज्ञान विद्याशाखेशी संबंधित अधिविभागांना भेटी दिल्या. या विभागांमधील स्मार्ट क्लासरूम सुरू आहेत का?, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेणाऱ्या सुविधांची व्यवस्था, सादरीकरणाच्या ठिकाणांवरील स्थिती, रंगरंगोटी व डागडुजी, साधनसामग्री, आदींची तपासणी केली. फिजिकल डिस्टन्सिंग, साफसफाई, नॅक समितीसमोर सादरीकरणाबाबतच्या काही सूचना यावेळी विभागप्रमुखांना करण्यात आल्या. कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि डॉ. कामत आणि देशमुख यांनी मंगळवारी एकत्रितपणे तंत्रज्ञान अधिविभाग, पर्यावरणशास्त्र, जैवतंत्रज्ञान अधिविभाग, दूरशिक्षण केंद्राची पाहणी केली.
‘नॅक’ सादरीकरणाची ठिकाणे, स्मार्ट क्लासरूमची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:25 AM