सांगली : खंडणीच्या गुन्ह्यातील साक्षीदार गोरखनाथ ऊर्फ मनोज माने (रा. अभयनगर) याचा खून करुन रातोरात गायब झालेला गुंड म्हमद्या नदाफ याच्या शोधासाठी पोलिसांची १२ पथके तैनात करण्यात आली आहेत. तरीही म्हमद्याचा शोध लागत नसल्याने पोलीस यंत्रणा हतबल झालेली दिसत आहे. म्हमद्याच्या शोधासाठी रविवारी रात्री शहरातील विविध भागात ‘कोम्बिंग आॅपरेशन’ मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, अटकेत असलेली म्हमद्याची पत्नी दिलशाद व आलमगीर पटेल या दोघांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने १७ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे.म्हमद्या कारागृहात असताना त्याच्या नावावर माने याने पैसे गोळा केले होते. म्हमद्या जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने घर बांधायला काढले होते. यासाठी त्याला दोन लाखाची गरज होती. म्हमद्याने त्याच्याकडे पैशाची मागणी केली. पण त्याने नकार दिला. यातून त्यांच्यात वाद सुरु होता. या वादातून म्हमद्याच्या साथीदारांनी माने व त्याचा मित्र भरत फोंडे यांचे अपहरण करुन मारहाण केली होती. याप्रकरणी भरतने संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी म्हमद्या व त्याच्या पाच साथीदारांविरुद्ध खंडणी व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून म्हमद्या मानेवर चिडून होता. त्याला संपविण्याची धमकीही त्याने दिली होती. त्यामुळे पोलिसांनी मानेला पोलीस संरक्षण दिले होते. गेल्या आठवड्यात पोलिसांनी मानेला घरी सोडले. आम्ही अर्ध्या तासात येतो, तू घरातून बाहेर पडू नकोस, असे सांगून पोलीस निघून गेले होते. मध्यंतरीच्या काळात माने सासऱ्याच्या मोबाईलवर फोन आल्याने तो बोलत घरातून बाहेर पडला आणि गायब झाला होता. रात्रभर त्याचा शोध सुरु होता. पण तो सापडला नाही. दुसऱ्यादिवशी बर्वे शाळेजवळ मानेचा मृतदेह आढळून आला होता.म्हमद्या नदाफ व त्याच्या साथीदारांनी खून केल्याचे निष्पन्न झाले होते. म्हमद्याला खुनापूर्वी व खून केल्यानंतर मदत करणाऱ्या सहाजणांना अटक केली. तसेच मानेला प्रत्यक्ष मारण्यात सहभागी असणाऱ्या सागर शेंडगेसह दोघांना अटक केली होती. आतापर्यंत आठ संशयितांना अटक केली आहे. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. म्हमद्याचा शोध सुरू असला तरी, त्याचा अद्याप सुगावा लागला नाही. चार दिवसांपूर्वी तो बुरखा घालून आईला भेटून गेला. त्याच्या भावामार्फत मृत मानेच्या कुटुंबास संपविण्याची धमकीही त्याने दिली आहे. त्यामुळे मानेच्या घराला पोलीस संरक्षण दिले आहे. आतापर्यंतच्या तपासात खुनात म्हमद्या, सागर शेंडगेसह तिघांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण आणखी कोण मारायला होते? त्याला घरापासून बर्वे शाळेजवळ कोणी नेले? त्याला मारण्याचा मूळ उद्देश काय होता? या बाबी उजेडात आल्या नाहीत. सागर शेंडगेच्या जबाबाला पोलिसांनी फारसे महत्त्व दिले नाही. म्हमद्या सापडल्याशिवाय या प्रकरणाचा उलगडा होणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. यासाठी म्हमद्याचा शोध घेतला जात आहे. त्यालाही पोलीस आपला एन्काऊंटर करतील, अशी भीती आहे. त्यामुळे तो पोलिसांबरोबर पाटशिवणीचा खेळ खेळत आहे. वरिष्ठ अधिकारी या तपासावर लक्ष ठेवून आहेत. (प्रतिनिधी)छापासत्र : आठ ठिकाणी ‘कोम्बिंग’म्हमद्याच्या शोधासाठी रविवारी रात्री पोलिसांनी संजयनगर, अभयनगर, चिन्मय पार्क, उत्कर्ष हडको कॉलनी, शिंदे मळा, अंकली नाका, आमराई या आठ ठिकाणी ‘कोम्बिंग आॅपरेशन’ मोहीम राबविली. संशयित वाहने व त्यामध्ये बसलेल्या लोकांची चौकशी केली. वाहनांची कागदपत्रेही तपासली. पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांच्यासह शंभरहून अधिक कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. पण म्हमद्याबद्दल काहीच माहिती हाती लागली नाही. गेल्या चार दिवसांत दुसऱ्यांदा ‘कोम्बिंग आॅपरेशन’ राबविण्यात आले आहे. स्मशानभूमीत छापेम्हमद्या सांगलीतच आश्रयाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. तो स्मशानभूमीत आश्रय घेऊ शकतो, असा अंदाज करून पोलिसांनी रविवारी रात्री सर्व समाजाच्या स्मशानभूमीत छापे टाकून तपासणी केली. तिथे असणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली. याशिवाय दर्गा व मशिदींचीही तपासणी केली. मात्र काहीच हाती लागले नाही. म्हमद्या वेशांतर करून फिरत असल्याची चर्चा आहे. त्याअनुषंगानेही पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे. म्हमद्या मोकाटच..!म्हमद्याच्या शोधासाठी डझनभर पथके तैनात केली आहेत. यामध्ये संजयनगर, सांगली शहर, विश्रामबाग पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण, गुंडाविरोधी पथक या विभागातील कर्मचारी अशी पथके म्हमद्याच्या शोधासाठी तैनात केली आहेत. तरीही त्याचा सुगावा लागत नसल्याने पोलीस हतबल झाल्याचे दिसत आहे. जयसिंगपूर (ता. शिरोळ), जत व कुडची (ता. रायबाग) येथे पथके धडकून आली आहेत. त्याच्या आश्रयदात्यांचाही शोध सुरू ठेवला आहे. आतापर्यंत सहा मदतनीसांच्या नाड्या आवळल्या आहेत. आणखी काहीजणांना अटक होऊ शकते.
म्हमद्या नदाफच्या शोधासाठी १२ पथके
By admin | Published: November 15, 2015 10:44 PM