कोल्हापूर : शहराला पाणी पुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे बालिंगा जलशुद्धीकरण केंद्र सोमवारी मध्यरात्री सुरु केल्यानंतर आता नागदेववाडी व शिंगणापूर येथील उपसा केंद्र सुरु करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. नागदेववाडी उपसा केंद्र आज, बुधवारी सुरु होईल. मात्र शिंगणापूर उपसा केंद्र सुरु होण्याकरिता पंचगंगा नदीची पातळी कमी होण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. शनिवारपर्यंत पूर्ण क्षमतेने पाणी सुरु करण्याचा पाणी पुरवठा विभागाचा निर्धार आहे.
बालिंगा उपसा केंद्र सोमवारी मध्यरात्री सुरु झाले. त्यातून मंगळवारपासून शहराच्या ए, बी, सी व डी भागाला कमी दाबाने का होईना पाणी पुरवठा सुरु झाला. मंगळवारी सकाळी नागदेववाडी उपसा केंद्रातील मोटारी, स्टार्टर तसेच ओकेव्ही पॅनेल पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्याची दुरुस्ती सुरु झाली. आज, बुधवारी मोटार जोडली जाईल. ज्यावेळी बालिंगा जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु होईल तेव्हा प्रतिदिन ६० दशलक्ष लीटर पाणी नागरिकांना देण्यात येईल. सध्या नागदेववाडीचा २० दशलक्ष लीटरचा पुरवठा कमी पडतो आहे. त्यामुळे बालिंगा जरी सुरु झाले असले तरी पाणी कमी दाबाने मिळत आहे.
रोज ८० दशलक्ष लीटर पाणी उपसा करणाऱ्या शिंगणापूर येथील केंद्र सुरु होण्याची सर्वांनाच प्रतीक्षा लागून राहिली आहे. परंतु पंचगंगा नदीची पातळी अद्यापही कमी झाली नसल्याने केंद्रात दहा ते बारा फूट पाणी असल्याने तेथपर्यंत पोहचून मोटारी बाहेर काढणे शक्य झालेले नाही. जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत कर्मचारी काहीच करु शकत नाहीत. या केंद्रात चार मोटारी आहेत, त्या दुरुस्त करण्यासही कालावधी जाणार आहे. पाणी कमी झाल्यावर त्या खोलल्यानंतर पुढे दोन दिवस दुरुस्ती आणि पुन्हा जोडण्यास लागतील.
महानगरपालिकेची पाणी पुरवठ्याची सर्व यंत्रणा तसेच पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करत असून विशेषत: जल अभियंता अजय साळुंखे, उप जल अभियंता (यांत्रिकी) जयेश जाधव यांनी उपसा केंद्रावर अक्षरश: ठाण मांडले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक हात राबत आहेत. शनिवारपर्यंत शिंगणापूरचा उपसा सुरु करुन पाणी पुरवठा करण्याचा निर्धार पाणी पुरवठा विभागाने केला आहे.