लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : प्रस्तावित नागपूर-रत्नागिरी महामार्ग हा शिये (ता. करवीर) येथील पूरबाधित क्षेत्रातून जात आहे. येथे भराव टाकून रस्ता झाल्यास पुराचा फटका करवीर तालुक्यासह कोल्हापूर शहराला बसणार आहे. यासाठी सध्याच्या राज्य मार्गाचे रुंदीकरण करून महामार्ग करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. माणिक शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. याबाबत गावकऱ्यांच्या वतीने उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ॲड. शिंदे म्हणाले, महामार्गाचा नकाशा राजकीय हस्तक्षेपामुळे दोन वेळा बदलण्यात आला. राजकीय मंडळींचा चार-आठ घरे वाचविण्यासाठी शिये परिसरातील शेतकऱ्यांची ९० एकर जमिनी गिळंकृत करण्याचा डाव आहे. या रस्त्याच्या रेखांकनास आम्ही विरोध केला. मात्र पोलीस बळाचा वापर करून तो मोडण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेतच, त्याशिवाय रेखांकित भागात दहा फूट पुराचे पाणी होते. त्यामुळे महामार्ग करताना येथे मोठ्या प्रमाणात मुरूम टाकला जाणार असल्याने पाण्याच्या तुंबीने करवीर तालुक्यातील अनेक गावांसह कोल्हापूर शहर पाण्याखाली जाणार आहे. हा महामार्ग सांगलीतून इस्लामपूर, शिराळा, मलकापूर असा करावा अथवा हातकणंगले, वाठार, वारणा, बोरपाडळे हा मार्गही योग्य आहे. या मार्गासाठी कोणाचीही हरकत नसताना शियेतूनच महामार्ग काढण्याचा अट्टहास कोणाचा, या रस्त्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती घेतल्या होत्या. मात्र, त्याची दखलही घेतली नाही. आता उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत असून तरीही रस्ता सुुरू केला तर मुरमाच्या ट्रकखाली आडवे होऊ, असा इशारा ॲड. शिंदे यांनी दिला. यावेळी राजेश नाईक, परशराम शिंदे, कृष्णात खुटाळे, उत्तम पाटील, मानसिंग पाटील, निखिल कुलकर्णी आदी उपस्थित होते.