कोल्हापूर : पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरूष कबड्डी स्पर्धेला सोमवारपासून शिवाजी विद्यापीठात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ (नागपूर), दत्त-मेघा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स (वर्धा), संत गागडेबाबा विद्यापीठासह (अमरावती) दहा विद्यापीठाच्या संघांनी पुढील फेरीत प्रवेश केला. असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीजतर्फे (एआययू) आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थानमधील ६८ संघ सहभागी झाले आहेत.
शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या हस्ते लोककला केंद्रातील क्रीडांगणाचे पूजन सकाळी आठ वाजता झाले. यावेळी कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे संभाजी पाटील, रमेश भेंडिगिरी, बाबासाहेब उलपे, अजित पाटील उपस्थित होते.
पहिल्या सामन्यात बिकानेरच्या महाराजा गगनसिंग युनिर्व्हेसिटीने जोधपूर युनिर्व्हेसिटीवर ४० गुणांनी, गोवा विद्यापीठाने गुजरातच्या नवसारी युनिर्व्हेसिटीला २५ गुणांनी, सूरतच्या वीरनर्मदा साऊथ गुजरात युनिर्व्हेसिटीने पुण्याच्या टिळक मराठा विद्यापीठाला ४८ गुणांनी हरविले. सरदार पटेल युनिर्व्हेसिटीने आयटीएम ग्वाल्हेरला ३२ गुणांनी, हेमचंद्राआचार्य गुजरातने मुंबईच्या डी. वाय. पाटील विद्यापीठाला १७ गुणांनी, सुवर्णम गुजरात स्पोर्टस् युनिर्व्हेसिटीने भक्तकवी नृसिंह मेहता युनिर्व्हेसिटीला १२ गुणांनी नमविले.
जयपूर युनिर्व्हेसिटीने अजमेरच्या महर्षी दयानंद सरस्वती युनिर्व्हेसिटीवर ९ गुणांनी निसटता विजय मिळविला. वर्धा येथील दत्त-मेघा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सने गांधीनगरच्या (गुजरात) कडीसरवा विश्वविद्यालयाला ५२ गुणांनी हरविले. अमरावतीच्या संत गागडेबाबा विद्यापीठाने गुजरातच्या रक्षाशक्ती युनिर्व्हेसिटीला ३२ गुणांनी पराभूत केले. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने जर्नादन रायनगर राजस्थान युनिर्व्हेसिटीवर ३८ गुणांनी विजय मिळविला.भावनगर विद्यापीठाचा संघ अपात्रभावनगरच्या महाराजा कृष्णकुमारसिंगजी युनिर्व्हेसिटीचे पैकी पाच खेळाडू अपात्र ठरल्याने हा संघ स्पर्धेतून बाद झाला. त्यामुळे जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला पुढे चाल मिळाली. गुजरातचे चार्टर युनिर्व्हेसिटी आॅफ सायन्स अनुपस्थित राहिल्याने उदयपूरच्या पॅसिफिक अकॅडमी आॅफ हायर एज्युकेशनला पुढे चाल मिळाली.