कोल्हापूर : शहादा (जि. नंदुरबार) येथे दि. २३ व २४ डिसेंबरला १३ वे विद्रोही साहित्य आणि संस्कृती संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षा नजुबाई गावित यांचा सत्कार व्यंकाप्पा भोसले यांच्या हस्ते रविवारी कोल्हापूरमध्ये करण्यात आला. कोल्हापूर प्रेस क्लबच्या पत्रकार परिषदेच्या कक्षातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतुल दिघे होते.
बहुजन समाजावर फॅसिझम पद्धतीने सध्या हुकुमशाही लादली जात असल्याची स्थिती आहे. या विरोधात मतभिन्नता विसरुन संघटीतपणे सर्वांनी लढण्याची गरज आहे. यासाठी सर्वांना एकत्रित करण्याच्या उद्देशाने विद्रोही साहित्य आणि संस्कृती संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारले असल्याचे नजुबाई गावित रविवारी सत्कारानंतर म्हणाल्या.
गावित म्हणाल्या, अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ पुढे जोमाने चालली पाहिजे. त्यासाठी या चळवळीला सर्वांनी बळ द्यावे. सातपुडा पर्वत रांगांच्या परिसरात यावर्षीचे संमेलन होत आहे. येथील आदिवासी समाजाची कला, संस्कृती पाहण्यासाठी कोल्हापुरातील डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते, लेखक आणि साहित्यिकांना यावे. दिघे म्हणाले, विद्रोही साहित्य, संस्कृती संमेलन हे समाजाचे आहे. त्याला सर्वांनी सहकार्य करावे. या कार्यक्रमास धनाजी गुरव, प्रशांत नागावकर, आदी उपस्थित होते.
अध्यक्षा गावित म्हणाल्या,
- अदिवासी समाजाने कला जोपसल्या आहेत.
- सर्वच कलांमध्ये बेगडीपणा येत आहे. चित्रपटांप्रमाणे संस्कृती पुढे येत आहे.
- पारंपारिक कला, संस्कृतीला पुढे आणण्यासाठी विद्रोही साहित्य संमेलन होत आहे.
- चळवळीच्या माध्यमातून लढताना साहित्याचे महत्त्व समजू लागले.
विविध विषयांवर होणार मंथनया संमेलनाचे उदघाटन दि.२३ डिसेंबरला सकाळी अकरा वाजता पंजाबचे आतमजितसिंग यांच्या हस्ते होईल, असे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्याध्यक्ष धनाजी गुरव यांनी सांगितले. ते म्हणाले, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष कविवर्य वाहरु सोनावणे, संयोजन समितीचे अध्यक्ष अरविंद कुंवर आहेत.
परिसंवाद, कवी संमेलन, गटचर्चा व मांडणी यांच्या माध्यमातून बहुजन समाजाचा शिक्षण हक्क, आजकालची लोकशाही, मराठी साहित्य, चित्रपट आणि आदिवासी संस्कृती, आदी विविध विषयांवर विचार मंथन होणार आहे. दि. २४ डिसेंबरला दुपारी चार वाजता मुडनाकूडू चिन्नास्वामी, डॉ. बाबूराव गुरव, सुधीर अनवले, सदाशिव मगदूम यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचा समारोप होईल.