शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड-बोरगाव या आंतरराज्य महामार्गावरील पाच मैल फाटा येथे कर्नाटक शासनाने नाकाबंदी करून नागरिकांना कोरोना चाचणी असल्याशिवाय प्रवेश बंद केला आहे. मात्र, दत्तवाड-सदलगा मार्गावर फक्त मुरूम व काटेरी झुडपे टाकून मार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी दुचाकीसाठी रस्ता करून गेले आठ दिवस वाहतूक सुरू केली आहे, तर दानवाड, एकसंबा, दत्तवाड, मलिकवाड, घोसरवाड, सदलगा या रस्त्यावरील वाहतूक खुलेआम सुरू आहे. दानवाड व दत्तवाड येथील शेतकऱ्यांनी याबाबत कर्नाटक सीमेवर जाऊन वाद घातल होता. कर्नाटकातील सदलगा नगरपालिका प्रशासनामार्फत सदलगा-दत्तवाड रस्त्यावरील पुलावर मुरमाचा बांध घातला आहे. मात्र, शेतकरी व नागरिकांनी मुरूम बाजूला करून दुचाकीसाठी वाहतूक सुरू केली आहे. दत्तवाड-मलिकवाड, दानवाड-एकसंबा येथे वाहतूक सुरळीत आहे. मात्र, मुख्य महामार्ग असणाऱ्या कुरुंदवाड-बोरगाव या रस्त्यावरील सीमेवर पोलीस, आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत नाकाबंदी करून नागरिकांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे असा दुजाभाव का असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
चौकट : नागरिकांतून संताप
लग्न समारंभासह इतर कार्यक्रमाला जाणाऱ्या नागरिकांकडून अर्थपूर्ण व्यवहार पूर्ण करून सीमेवरून कर्नाटकात सोडले जात आहे. मात्र, सामान्य नागरिकांना मात्र कोरोना तपासणी व लसीची सक्ती करून वेठीस धरले जात आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
फोटो - १४०८२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - पाचवा मैल-बोरगांव या मार्गावर कर्नाटक पोलिसांकडून अशाप्रकारे फलक लावण्यात आला आहे.