कोल्हापूर : राजारामपुरी मेन रोडवरील मारुती मंदिरात गाभाºयाच्या पाठीमागील फरशीवर कापडात गुंडाळलेली सात महिन्यांची ‘नकोशी’ शुक्रवारी रात्री येथील नागरिकांना मिळून आली. एक महिला तिला सोडून गेल्याचे नागरिकांनी पाहिले. त्यानुसार राजारामपुरी पोलीस त्या निर्दयी आईचा शोध सीसीटीव्ही फुटेजद्वारे घेत आहेत. ‘नकुशी’वर सीपीआर रुग्णालयात उपचार करून बालकल्याण संकुलात पाठविले. तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अधिक माहिती अशी, राजारामपुरी मेन रोडवर प्रसिद्ध मारुती मंदिर आहे. तिथे दर्शनाला भाविकांची वर्दळ असते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास मंदिर बंद करण्यासाठी पुजारी किरण धनपाल साठे (वय ४०, रा. राजारामपुरी) मंदिरात आले. यावेळी एक महिला ध्यान करीत बसली होती. तिला मंदिर बंद करणार आहोत असे साठे यांनी सांगताच तिने काही वेळापूर्वी एक महिला बाळाला घेऊन आली.
गाभाºयामागे बाळाला ठेवून धावत निघून गेली असे सांगितले. हे ऐकून पुजारी साठे भांबावले. त्यांनी गाभाºयामागे जाऊन पाहिले असता सात महिन्यांचे बाळ कापडामध्ये गुंडाळून ठेवले होते. ते खेळत असल्याचे पाहून त्यांनी आजूबाजूला त्याची आई आहे का चौकशी केली. महिला आपल्या पोटच्या बाळाला मंदिरात सोडून गेल्याचे वृत्त परिसरात समजताच नागरिकांनी गर्दी केली.
कापडात गुंडाळलेले बाळ पाहून अनेकांना गहिवरून आले. निर्दयी मातेविषयी संताप व्यक्त केला. या प्रकाराची माहिती राजारामपुरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. बाळाला सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर त्याला बालकल्याण संकुलात ठेवले.
‘नकुशी’चे वर्णन
अंगाने मध्यम, रंग सावळा, चेहरा उभट, नाक सरळ, उंची दीड फूट, डोक्याला बारीक केस, अंगात टी शर्ट, त्यावर जॅकेट असे बाळाचे वर्णन आहे. या बालकाविषयी कोणाला माहिती असेल तर याबाबत पोलिसांना कळवावे. त्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांनी केले आहे.
निर्दयी माता कॅमेºयात कैद
मारुती मंदिराच्या परिसरात महाराष्ट्र बँक आहे. या बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये ‘नकुशी’ची आई कॅमेराबद्ध झाली आहे. त्यावरून पोलीस तिचा शोध घेत आहेत. मारुती मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत; परंतु मंदिरातील अंतर्गत कामामुळे ते काही दिवसांपासून बंद ठेवले आहेत, अन्यथा ती येथील कॅमेºयात स्पष्टपणे दिसली असती.