इंदुमती गणेश-
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेल्या पाच वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील ८४ अनाथ बालकांना हक्काचे आई-वडील आणि घर मिळाले आहे. यातील तिळे असलेल्या बहिणी इटलीत, तर अन्य एक बालक कॅनडामध्ये परदेशी माता-पित्यांच्या कुशीत विसावले आहे. मुलांच्या तुलनेत मुली दत्तक जाण्याचे प्रमाण वाढले आहे. म्हणजे एका बाजूला गर्भातच मुलीचा गळा घोटण्याची प्रवृत्ती ज्या समाजात वाढीस लागली आहे, त्याच समाजाला आता मुलाला बहीण म्हणून कन्याच दत्तक हवी, असे चित्र दिसत आहे. पाच वर्षात ४४ मुलींना दत्तक घेण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील अनाथ निराधार बालकांना बालकल्याण समितीच्या आदेशानंतर मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुल किंवा डॉ. प्रमिला जगर यांच्या शिशू आधार केंद्रात पाठवले जाते. या दोन्ही संस्थांमध्ये बालकांचे खूप चांगल्याप्रकारे संगोपन केले जाते. एकदा बाळ संस्थेत दाखल झाले की, त्याच्या पालकांचा शोध घेतला जातो. पालकांनी संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन केले जाते. पण त्यानंतरही बरेच दिवस बालकाची चौकशी करायला कोणी आले नाही, तर त्या बाळाचे नाव दत्तक प्रक्रियेसाठी पाठवले जाते. पूर्वी ही दत्तक प्रक्रिया संस्थात्मक पातळीवर चालवली जात होती, आता मात्र केंद्र शासनाने ती ऑनलाईन केल्याने कोणतेही बाळ कोणत्याही राज्यात दत्तक जाऊ शकते आणि देशांतर्गत कोणी हे बाळ दत्तक घ्यायला तयार नसेल, तर त्यांना परदेशातही देता येते.
कोल्हापुरातील या दोन्ही संस्थांमधून वर्षात २५ ते ३० च्या आसपास बालके दत्तक जातात. दत्तक दिल्यानंतरही दर सहा महिन्यांनी बालक त्या पालकांकडे व्यवस्थित आहे का, त्याचे योग्यरित्या संगोपन केले जाते का, याची तपासणी केली जाते.
---
गेल्या पाच वर्षात दत्तक गेलेली बालके
साल मुले मुली
२०१६ : ७ : ६
२०१७ : ९ : १६
२०१८ : १३ : १२
२०१९ : ६ : ६
२०२० : ५ : ४
एकूण : ४० : ४४
----
२०१७ आणि २०१८ मध्ये सर्वाधिक २५ बालके दत्तक घेतली गेली. २०२० मध्ये मात्र कोरोनामुळे दत्तक प्रक्रिया थांबली होती. नोव्हेंबरपासून ती सुरू करण्यात आली असून तेव्हापासून आजतागायत १० बालके दत्तक गेली आहेत.
---
कॅनडा आणि इटलीचे नागरिकत्व
अनाथ भावंडांची ताटातूट होऊ नये यासाठी त्यांना एकाच कुटुंबात दत्तक देण्याचा कायदा आहे. त्यामुळे दोन मुली, दोन मुलं, एक-मुलगा एक मुलगी अशी भावंडं असतील, तर त्या दोघांनाही दत्तक घेतील असे कुटुंब पाहिले जाते. शिशू आधार केंद्रात २०१८ साली तिळ्या मुली दाखल झाल्या होत्या. या तिघींना दत्तक घ्यायला भारतातील एकही कुटुंब तयार नव्हते. अखेर इटलीतील एका दाम्पत्याने त्यांना दत्तक घेतले असून मुली तेथे आनंदात आहेत. अशाच रितीने शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या एका बालकाला कॅनडातील पालक मिळाले आहेत.
-----------
मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया...
- पालकांनी कारा गाईडलाईननुसार त्यांच्या वेबसाईटवर कागदपत्रांसह ऑनलाईन नाव नोंदणी करावी लागते.
- ज्या जिल्ह्यातून नोंदणी झाली आहे तेथील संस्थेचे पदाधिकारी घरी भेट देऊन त्यांच्या आर्थिक, सामाजिक स्थितीची पाहणी करून अहवाल त्या वेबसाईटवर अपलोड करतात. त्यानंतर पालकांचे नाव वेटिंग लिस्टमध्ये जाते.
- आपल्या बऱ्याच अटी-शर्ती असतील तर बाळ मिळायला सहा महिने ते वर्षभराचा कालावधी लागतो. जसे बाळ उपलब्ध असेल पालकांना तसा एसएमएस व ई मेल पाठवला जातो. तसेच आपल्या संस्थेतील या बाळाला, अमुक पालकांना दत्तक द्यायचे आहे, हे कळवून संपर्क साधायला सांगितले जाते.
- बाळ पसंत पडल्यानंतर न्यायालयात अर्ज सादर करावा लागतो. दोन तारखांमध्ये ही केस निकाली काढून महापालिकेच्या जन्मदाखल्यासह पालकांच्या हाती बाळ सुपूर्द केले जाते.
----------------