शिरोळ/मिरज : ‘आता रडायचं नाही, लढायचं’, अशा शब्दांत पुरग्रस्तांना धीर देत शिरोळमधील पूरग्रस्तांसाठी सर्वांच्या सहकार्याने ५०० घरे नाम फाऊंडेशनतर्फे बांधण्यात येतील, अशी घोषणा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केली.अभिनेते नाना पाटेकर यांनी बुधवारी शिरोळ तालुक्यातील पूरस्थितीची पाहणी केली. यानंतर त्यांनी दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर पूरग्रस्तांची भेट घेऊन संवाद साधला. पूरग्रस्तांच्या घरांसाठी मी स्वत: पुढाकार घेऊन लोकांना आवाहन करणार असल्याचे स्पष्ट करून पाटेकर म्हणाले, शासनाचे घरकुल बांधण्यासाठी असलेले अनुदान व त्यामध्ये लागणारी सर्व रक्कम नाम फाउंडेशनमार्फत देऊन पूरग्रस्त बांधवांच्या घराचे स्वप्न साकार करायचे आहे. घर बांधणीसाठी जागा निश्चित करून शिरोळ तालुक्यात घरे बांधून देण्यात येतील. प्रत्येक वर्षी शासनाच्यावतीने घरबांधणीसाठी रमाई, इंदिरा आवास व प्रधानमंत्री योजनेतून कुटुंबांना अनुदान दिले जाते. यातील जाचक अटी शिथिल करून घरकुल अनुदानाची रक्कम आणि नाम फाउंडेशनकडून उर्वरित रक्कम एकत्र करून पूरबाधित ५०० कुटुंबांना घरे बांधून देण्याचा निर्णय नाना पाटेकर यांनी जाहीर केला.
आता रडायचं नाही, लढायचं, नाम फाऊंडेशन बांधणार पूरग्रस्तांसाठी ५०० घरे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 5:46 AM