कोल्हापूर : गेली २५ वर्षे पंचगंगा शुद्धिकरणासाठी शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तिगत पातळीवर अथक प्रयत्न सुरू आहेत. या सर्वांविषयी आदर व्यक्त करीत, या सगळ्या कामाला श्रद्धेची जोड देत नागरिकांचा आपली माता पंचगंगेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी, तसेच पंचगंगेच्या प्रकटदिनानिमित्त ‘नमामि पंचगंगा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याला समाजाने साथ द्यावी, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले.
आमदार अमल महाडिक यांच्या पुढाकाराने आयोजित ‘नमामि पंचगंगा’ उपक्रमाच्या प्रारंभावेळी गुरुवारी सायंकाळी नदीकाठी आयोजित कार्यक्रमामध्ये शौमिका महाडिक यांनी हे आवाहन केले. यावेळी नदीविषयी आस्था असणाऱ्या हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पंचगंगेची आरतीही करण्यात आली.
यावेळी आमदार महाडिक यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अंबरीश घाटगे, ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, भाजपचे शहराध्यक्ष संदीप देसाई, नवोदिता घाटगे, महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.शौमिका महाडिक म्हणाल्या, केवळ एक दिवस आरती करून हा प्रश्न सुटणार नाही, याची आम्हांला जाणीव आहे. कुणालाही काही करू नको, असे सांगून भागत नाही; म्हणूनच नदीकडे पाहण्याची भावनाच बदलण्यासाठी या पंचगंगेचे आध्यात्मिक, नैसर्गिक महत्त्व सांगत ही भावना बदलण्यासाठी हा उपक्रम आहे. संत, शासन आणि समाज या त्रिसूत्रीच्या आधारावर पूजा, परंपरा, परिक्रमा आणि पर्यटन या माध्यमांतून हा उपक्रम लोकाभिमुख करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. नर्मदा परिक्रमेच्या धर्तीवर पंचगंगा परिक्रमा उपक्रम असून, पावसाळ्यानंतर १४ दिवस पंचगंगेच्या सान्निध्यात ही परिक्रमा पूर्ण केली जाणार आहे. यातूनच तिच्याविषयी आस्था वाढण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमाचे संकल्पक उमाकांत राणिंगा म्हणाले, पंचगंगा नदीकाठी राहणाºया नागरिकांच्या हृदयाला हात घालून नदीविषयी श्रद्धा निर्माण करून तिचे पावित्र्य राखण्यासाठी यापुढील काळात काम केले जाईल.
अॅड. प्रसन्न मालेकर म्हणाले, ‘करवीरमाहात्म्या’मध्ये पंचगंगेचा उल्लेख असून, या मातेचे पावित्र्य जपत तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपक्रम कार्यरत केला आहे. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेतील भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे, अनेक सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती, जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख, पारस ओसवाल, माणिक पाटील-चुयेकर, बाबा पार्टे, विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शिवाजी गावडे यांनी प्रास्ताविक केले.स्वच्छता मोहिमेत महाडिक दाम्पत्याचा सहभागतत्पूर्वी, गुरुवारी सकाळी पंचगंगा घाटावर सुमारे ५०० जणांनी स्वच्छता मोहीम राबविली. प्रामुख्याने पिकनिक पॉइंटखालील सर्व घाण यावेळी काढण्यात आली. जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. आमदार अमल महाडिक आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनीही या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला. नदीकाठाला साठलेले प्लास्टिक, थर्माकोल अक्षरश: नदीत उतरून काढण्यात आले. येथे गोळा केलेला सर्व कचरा महापालिकेच्या डंपरमधून नेण्यात आला.नदीकाठी उमटले आरतीचे सूरया भक्तिभावपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शेजारीच असलेल्या शंकराचार्य मठामधून मंगल कलश आणले. सूर्यास्त होताच १०८ दिव्यांनी पंचगंगेची आरती केली. सूर्य मावळतीला गेल्यानंतरचा संधिप्रकाश आणि या दिव्यांमुळे पंचगंगा घाटाचे एक वेगळेच रूप यावेळी पाहायला मिळाले. यावेळी खडीसाखर-फुटाण्यांचा प्रसाद दिला. तसेच होमही केला. धुपाच्या सुगंधाने आसमंत भारलेला होता.गेली १0 वर्षे होते आरतीपंचगंगा भक्ती सेवा मंडळातर्फे रोज सायंकाळी सहा वाजता पंचगंगेची आरती करण्यात येते. स्वप्निल मुळे, राजाभाऊ कुंभार, धनाजी जाधव, अवधूत भाट, शालन भुर्के, हणमंत हिरवेहे रोज या आरतीला उपस्थित असतात.कोल्हापूर येथे ‘नमामि पंचगंगा’ उपक्रमांतर्गत गुरुवारी सायंकाळी पंचगंगा घाटावर आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्यासह हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पंचगंगा नदीची आरती करण्यात आली.