कोल्हापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशीद, मोकळी जागा किंवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये, सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करावेत, अशा मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.
मुस्लीम बांधवांच्या रमजान रोजेला सुरुवात होत आहे. या कालावधीत मुस्लीम बांधव नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार या वर्षी पवित्र रमजान महिना साजरा करावा लागणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी वरील सूचना दिल्या आहेत.
यानुसार सार्वजनिक ठिकाणी एकावेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत हा सण साधेपणाने साजरा करावा. सेहरी व इफ्तारच्या वेळी अनेक फळ व अन्नपदार्थ विक्रेते गर्दी करण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने या बाबत योग्य ती उपाययोजना करावी. शब-ए-कदर तसेच शेवटच्या शुक्रवारी मशिदीत येऊन दुवा पठण (अलविदा जुम्मा) करण्याची प्रथा आहे. मात्र यंदा मुस्लीम बांधवांनी आपल्या घरातच दुवा पठण करावे.
साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करू नये. तसेच कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी हा सण साधेपणाने साजरा करण्यासाठी जनजागृती करण्यात यावी.