हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील श्री नामदेव शिंपी समाज उन्नती मंडळाच्या जागेवरील अतिक्रमण काढावे, या मागणीसाठी समाजाच्यावतीने सोमवारपासून नगरपरिषद कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले बेमुदत उपोषण आज तिसऱ्या दिवशीही योग्य तोडगा निघाला नसल्याने पुढे सुरूच राहिले.
याप्रश्नी नगरपरिषद प्रशासन व महसूल विभागाचे लक्ष वेधण्यासाठी व या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी समाजातील महिलांनी चूलबंद आंदोलन करून मुलाबाळांसह बुधवारच्या उपोषणात सहभाग घेतला होता. तसेच अनेक प्रस्थापितांनीही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, तरीही योग्य असा तोडगा निघालाच नाही. परिणामी, नगरपरिषद प्रशासन व तहसीलदार कार्यालय केवळ कागदी घोडे नाचवून समाजाचा अंत पाहत आहेत, असा आरोप नामदेव शिंपी समाजाच्यावतीने करण्यात येत आहे.
येथील सिटी सर्व्हे क्रमांक २८00 मध्ये श्री नामदेव शिंपी समाजाने मंदिर उभारले आहे. या मंदिराच्या जागेतच इंग्रोळे बंधूंनी अतिक्रमण केले आहे. समाजाने काही दिवसांपासून या जागेभोवती कंपाऊंड घालण्याचे काम सुरू केले आहे. कंपाऊंड घालतेवेळी समाजाने आणखी काही जागा सोडावी, अशी आडवणूक इंग्रोळे बंधूंनी केली आहे.
त्यामुळे समाजावर हा अन्याय असून, नगरपरिषदेने इंग्रोळे बंधूंचे हे अतिक्रमण काढावे, या मागणीसाठी श्री नामदेव शिंपी समाज उन्नती मंडळाच्यावतीने सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शहरातील अनेक प्रतिष्ठितांनी गेले दोन दिवस प्रयत्न केले. बुधवारी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार राजीव आवळे, तहसीलदार भोसले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाट, आदींनीही प्रयत्न केले. तरीही समाजाने आंदोलन मागे घेण्यास नकार दिला.
परिणामी, तहसीलदार भोसले यांनी नगरपरिषद प्रशासनाने संबंधित अतिक्रमण काढून घ्यावे, असा लेखी आदेश दिला आहे. त्यामुळे आज, गुरुवारी नगरपरिषद प्रशासन इंग्रोळे यांना अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस देण्याची शक्यता आहे.या उपोषणामध्ये राजेंद्र औंधकर, प्रकाश पतंगे, अनंत माताडे, अभय पतंगे, शीतल हावळ, राहुल चोपडे, सचिन वणारसे, केदारनाथ पतंगे, उदय माळवदे, मनोज कुमठेकर, मुकेश पतंगे यांचा सहभाग आहे.हुपरी येथील श्री नामदेव समाज उन्नती मंडळाच्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण हटवावे, या मागणीसाठी सोमवारपासून सुरू असलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी समाजातील महिलांनी चूलबंद आंदोलन करून उपोषणात सहभाग घेतला.