लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहराच्या सर्व प्रमुख मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली आहे; परंतु हे तपासणी नाके म्हणजे सध्या 'आओ जाओ घर तुम्हारा' अशा स्थितीत आहेत. अनेक वाहने सर्रास ये-जा करीत आहेत. नाक्यांवर पोलीस असतानाही मोजक्याच वाहनांची तपासणी सुरू आहे. त्यामुळे यावर नेमके नियंत्रण कोणाचे, असा सवाल उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतरही जिल्ह्यात सर्वत्र रुग्णसंख्या वाढत असल्याने विविध ठिकाणी नाकाबंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार इचलकरंजी शहरात नदीवेस नाका, यड्राव फाटा, पंचगंगा साखर कारखाना चौक, कबनूर ओढ्यावर, कोल्हापूर रोड व सांगली नाका या सहा ठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत. याठिकाणी पोलिसांना शहरामध्ये येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी होताना दिसत नाही. नदीवेस नाका येथे कर्नाटक व शिरोळ तालुक्याची सीमा असतानाही तपासणी होत नाही. त्यामुळे शहरामध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी नाक्यांची पाहणी करून संबंधितांना सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
फोटो ओळी
०६०५२०२१-आयसीएच-१३
०६०५२०२१-आयसीएच-१४ नदीवेस नाका येथे तपासणी नाक्यावर वाहने ये-जा करीत आहेत. त्यांची तपासणी होताना दिसत नाही.
छाया-अक्षय पोवार