इचलकरंजी : शहरात कोरोना रुग्णांची दिवसागणिक वाढणारी रुग्णसंख्या प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून शहरात येणाऱ्या चारही नाक्यांवर तपासणी केंद्रे सुरू केली. मात्र नदीवेस नाक्यावर प्रशासनाने तपासणीची तोकडी व्यवस्था केली आहे. कर्नाटक राज्यातून येणाऱ्या नागरिकांना कडक तपासणी न करता शहरात प्रवेश दिला जात आहे.
इचलकरंजी हे कर्नाटक राज्याच्या हद्दीवरील शहर आहे. तसेच औद्योगिक शहर असल्यामुळे कर्नाटक राज्यातून इचलकरंजीमध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्याही अधिक आहे. दोन राज्यांना जोडणारा मुख्य मार्ग असल्याने प्रशासनाकडून कडक नियोजन करण्याची आवश्यकता आहे. परंतु या ठिकाणी केवळ नावापुरते बॅरिकेट्स लावून तपासणी केली जात आहे.
प्रत्येक नागरिकाची तपासणी करूनच प्रवेश दिला जाणे गरजेचे असतानाही अनेकजण बिनधास्तपणे ये-जा करताना दिसत आहेत.
राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरत असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाला थोपविण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत; पण रुग्णसंख्या वाढतच चालल्याने गुरुवार (दि. २२) पासून नवीन नियमांसह कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार प्रशासनाच्या वतीने शहरात दाखल होणाऱ्या कबनूर काळ्या ओढ्याजवळ, आभार फाटा, यड्राव फाटा, पंचगंगा साखर कारखाना, पंचगंगा नदी पूल, टाकवडे वेस या ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी केंद्र उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अनेक नाक्यांवर दुपारनंतर कोणतीही सक्षम यंत्रणा राबविण्यात येत नाही.
सकाळच्या सुमारास नागरिकांची तपासणी केली जाते; परंतु दुपारनंतर यामध्ये कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई होताना दिसत नाही. साधारण सर्वच नाक्यांवर सारखीच परिस्थिती आढळून येत आहे. अशा यंत्रणेमुळे शहरात कोरोनाला अटकाव घालणे अशक्य आहे.
केवळ आदेश पाळण्यासाठी अंमलबजावणी
शहराला जोडणाऱ्या प्रमुख मार्गांसह अंतर्गत रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रशासनाने दिलेल्या आदेशाची केवळ अंमलबजावणी पाळण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पोलीस अधीक्षकानी केली नाक्यांची पाहणी
शहरात सहा ठिकाणी तपासणी नाक्यांची उभारणी केली आहे. शनिवारी दुपारी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी तपासणी नाक्यांची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांना कडक तपासणी करण्याचे आदेश दिले. तसेच कोणत्याही प्रकारची कसूर राहणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत सूचनाही केल्या. यावेळी त्यांच्यासोबत अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी उपस्थित होते.
फोटो ओळी
1) तपासणी नाक्यावर बॅरिकेट लावून सोडले आहे.
2) पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी तपासणी नाक्यांची पाहणी केली.