कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील फेरिवाल्यांचा संपूर्ण व परिपूर्ण सर्व्हे केल्याशिवाय एकाही फेरिवाल्याला विस्थापित केले जाऊ नये. फेरिवाला कायद्यांची अंमलबजावणी करावी व अतिक्रमणाच्या नावाखाली सुरु केलेली फेरिवाल्यांवर कारवाई त्वरित थांबवावी अशी मागणी फेरिवाल्यांनी मोर्चाद्वारे केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना निवेदन दिले.
सोमवारी सकाळी शिवाजी चौक येथून सर्वपक्षीय फेरिवाले कृती समितीच्या नेतृत्वाखाली या मोर्चाला सुरुवात झाली. फेरिवाले कायद्यांची अंमलबजावणी करा, एकाही फेरिवाल्यांना विस्थापित केले जाऊ नये, असे आशयाचे फलक घेऊन व महापालिका प्रशासनाचा निषेधाचे मोर्चात आणण्यात आले. माळकर तिकटीमार्गे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सर्वजण आले.
शहरातील पंरपरागत व बायोमेट्रिक्स कार्डधारक फेरिवाल्यांनाही मोठ्या प्रमाणात विस्थापित केले आहे. ही कारवाई निषेधार्हं व पथविक्रेता कायद्याशी पूर्णपणे विसंगत आहे. केंद्र सरकारचा पथविक्रेता अधिनियम २०१४ व राज्यशासनाचा पथविक्रेता अधिनियम २०१६ च्या अधिन राहून फेरिवाल्यांच्या नियोजनाची प्रक्रिया राबविणे बंधनकारक असताना प्रशासन मनमानीपणे फेरिवाल्यांवर वरवंटा फिरवत आहे. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येतील व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल, अशा भावना यावेळी फेरिवाल्यांनी व्यक्त केल्या.
सर्वपक्षीय फेरिवाले कृती समितीने सोमवारी कोल्हापूर महापालिकेवर फेरिवाल्यांच्या प्रश्नांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी निवेदन स्विकारुन मोर्चेकरांना कारवाईबाबतची माहिती दिली. यावेळी दिलीप पवार, महमदशरीफ शेख, समीर नदाफ आदी उपस्थित होते. (छाया : दीपक जाधव)
सुभाष वोरा म्हणाले, फेरिवाल्यांचे संसार उधळण्याचे काम प्रशासन करीत आहे. हे निषेधार्हं आहे. त्यांना विस्थापित केले जाऊ नये. दिलीप पवार म्हणाले, प्रशासनाची ही कारवाई एकतर्फी आहे. तसेच ते चुकीची आहे. रघुनाथ कांबळे म्हणाले, फेरिवाल्यांवर अन्याय झाला तर ते बेरोजगार होतील. बेरोजगारीमुळे ते गुन्हेगारीकडे वळतील.
यावेळी श्रीधर पाटणकर यांना निवेदन दिले. ते म्हणाले, आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी हे प्रशासकीय प्रशिक्षणासाठी बाहेर गेले आहेत. आम्ही रस्त्यावर अडथळे असणाºयांवर व अनाधिकृत केबिनधारकांवर कारवाई केली आहे. फेरिवाल्यांवर कारवाई केलेली नाही.
त्यावर समीर नदाफ यांनी, बायोमेट्रिक कार्डधारक असणाºयांना विस्थापित केले आहे, असा आक्षेप घेतला. आयुक्त प्रशिक्षणासाठी गेले आहेत हा धागा पकडून आयुक्तांना खरोखरच प्रशिक्षणाची गरज आहे.
फेरिवाल्या कायद्याचा अभ्यास न करता फेरिवाल्यांवर ही कारवाई केली आहे. त्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन फेरिवाल्या कायद्याचा अभ्यास करावा असे सांगितले. मोर्चात महमंदशरीफ शेख, तय्यब मोमीन, मारुती भागोजी, प्र.द.गणपुले, अमर जाधव, संतोष आयरे, सोमनाथ घोडेराव , बाबासाहेब मुल्ला यांच्यासह फेरिवाल्यांचा सहभाग होता.