कोल्हापूर : शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत आमदार प्रकाश आबिटकर यांचे नाव असल्याचे समजल्यावर रात्री ११.३० गारगोटीतून चार-पाच गाड्यातून प्रमुख कार्यकर्ते मुंबईला मध्यरात्रीच रवाना झाले. हे लोक पनवेलला जाईपर्यंत निरोप आला की मंत्रीपदाची संधी हुकली. नाराज होवून नेत्यांवर आगपाखड करत हे कार्यकर्ते तेथूनच आमदार आबिटकर यांची भेटही न घेता माघारी परतले.
शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेवून जिल्ह्यात राजकारण करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर पक्षाने अन्याय केल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. राधानगरी-भूदरगडच्या राजकारणात आबिटकर मोठे होवू नयेत यासाठी जिल्ह्यातून कांही लॉबिंग झाले असल्याचा संशय कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.जिल्ह्यात २०१४ ला शिवसेनेचे दहापैकी सहा आमदार होते. त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकालाही मंत्रिपदाची संधी दिली नाही. कोल्हापूरला गृहीत धरून चालल्याने त्याचे पडसाद २०१९ च्या निवडणुकीत उमटले आणि सहा वरून एकवर संख्याबळ आले. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते के. पी. पाटील यांचा पराभव करून प्रकाश आबिटकर यांनी आमदारकी कायम राखली. त्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आल्याने किमान आता तरी शिवसेना कोल्हापूरला प्रतिनिधित्व देईल, अशी अपेक्षा होती.
आबिटकर यांच्यासाठी खासदार संजय मंडलिक यांनी जोरदार प्रयत्न केले. दोन खासदारांच्या जोडीला एक मंत्रिपद मिळाले तर शिवसेना भक्कम होईल, हे ‘मातोश्री’ला पटवून देण्याचा प्रयत्न झाला. सातारातून शंभूराजे देसाई व कोल्हापुरातून आबिटकर यांचा मंत्रिमंडळातील समावेश जवळपास निश्चित मानला जात होता.रविवारी दिवसभर मुंबईत मंत्रिपदाच्या यादीवर खलबते सुरू होती; मात्र अंदाज येत नव्हता. जसजशी विस्ताराची वेळ जवळ येईल, तशी आबिटकर समर्थकांची घालमेल वाढली. गेले दोन-तीन दिवस सोशल मीडियावरून ‘नामदार आबिटकर’ अशा पोस्ट कार्यकर्त्यांच्या फिरत होत्या. त्यामुळे आमदार आबिटकर यांना मंत्रिपदाची खात्री होती.आमदार आबिटकर यांचा फोन येईल आणि आपण तिकडे रवाना व्हायचे या तयारीनेच कार्यकर्ते बसले होते. पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडीच्या घडामोडीत प्राचार्य अर्जुन आबिटकर अडकले होते. रविवारी रात्री मुंबईला निघा, असा निरोप मिळाल्यानंतर कार्यकर्ते रवानाही झाले. मात्र, सोमवारी सकाळी यादीत नाव नसल्याचे समजल्यानंतर कार्यकर्ते नाराज झाले.विशेष म्हणजे अपक्ष म्हणून निवडून आलेले राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नावाची कोठेच चर्चा नव्हती; मात्र ते ‘डाकडॉर्स’ ठरले. रविवारी मध्यरात्री शिवसेनेच्या यादीत यड्रावकर यांचे नाव दिसले. त्यांच्या रूपाने कोल्हापूरला तिसरे मंत्रिपद मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या धक्क्याने सोमवारी शिरोळात एकच जल्लोष झाला; मात्र ‘राधानगरीत’ सन्नाटा राहिला.महामंडळावर संधी शक्यमंत्रिमंडळात आबिटकर यांना संधी न मिळाल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत कमालीची नाराजी आहे. त्यामुळे आगामी काळात कॅबिनेट अथवा राज्यमंत्री दर्जाचे महामंडळावर त्यांची वर्णी लागू शकते.