सीपीआर रुग्णालयात पन्हाळा तालुक्यातील मालेच्या कोरोना रूग्णावर उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आल्याने त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होणे कठीण होते. रविवारी वारंवार त्यांचे नातेवाईक डॉक्टरांकडे विचारणा करत होते. मात्र, एका आरोग्य कर्मचाऱ्याने नातेवाईकांना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्याने ही माहिती गावाकडे दिली. आरोग्यसेविकेने ही माहिती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिली. कुणीच खात्री न केल्याने पन्हाळा तालुक्याच्या रविवारच्या अहवालात संबंधित मृत झाल्याचे जाहीर करण्यात आले.
हा अहवाल जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी मोरे यांच्याकडे गेला. त्यांनी अधिक चौकशी केली असताना संबंधित रुग्ण अजूनही उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले; परंतु अखेर त्यांचा सोमवारी दुपारी अडीच वाजता मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. मृत्यूच्या आदल्या दिवशी मृत्यू अहवालात नाव आल्याने नातेवाईकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला.