इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभेची उमेदवारी काॅंग्रेसचे शहर अध्यक्ष संजय कांबळे यांना दिली जाणार नाही. त्यांना पुढे करून फसवले जात आहे. शिरोळ, हातकणंगले, त्याचबरोबर कोणत्या तालुक्यातून कोणाला उमेदवारी मिळणार आहे? जिल्ह्यातील दहा जागांवर उमेदवारी कोणाला मिळणार आहे, त्या नावाची चिठ्ठी कांबळे यांच्या खिशात असून, त्या चिठ्ठीत त्यांचे नाव नाही, हे त्यांनाही माहीत आहे ; पण ते बोलत नाहीत. अशी गुगली आमदार प्रकाश आवाडे यांनी कांबळे यांच्या उपस्थितीत टाकली. विणकर सेवा संघ महाराष्ट्राचा मेळावा प्रदेशाध्यक्ष सुनील मेटे यांच्या उपस्थितीत घोरपडे नाट्यगृहामध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते.कोष्टा-कोष्टी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण वरोडे यांनी विणकर समाज मोठा असून त्यांना आमदारकीची संधी मिळाली पाहिजे, अशी भूमिका मांडली. त्याचा धागा पकडून आवाडे म्हणाले, संजय कांबळे यांना शहर अध्यक्ष मीच केले आहे. त्यांना माझ्याकडे द्या. मी कोठे घेऊन जायचे आहे, तिकडे घेऊन जाऊन त्यांना विधानसभेत अथवा विधानपरिषदेत आमदार करेन. संजय यांच्या कानात वारे घुसले नाही. त्यामुळे ते इतरांसारखे इकडून तिकडे गेले नाहीत. सोलापूरच्या धर्तीवर विणकरांसाठी घरकुले बांधली जातील. पहिल्या टप्प्यात २०० घरे आणि नंतरच्या काळात ५०० घरांचे नियोजन केले जाईल. त्यासाठी एक चांगली जागा उपलब्ध आहे. ती जागा बघून त्यावर निर्णय घेऊया. मी टप्प्याटप्प्याने त्याचा पाठपुरावा करेन.शहरातील मान्यवरांचा संघटनेच्यावतीने स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रताप होगाडे, सुहास जांभळे, पुंडलिक जाधव, मंदार भाकरे, प्रेमल माळी, राहुल लाटणे, नागेश क्यादगी, आकाश मुल्ला, अमित खानाज आदी उपस्थित होते.
आवाडे यांनी सुरुवात केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना युवकांना राजकारणात पुढे आणावे, असे सांगितले. इचलकरंजीत पहिले काम प्रकाश आवाडे यांनी केले. त्यांनी आपल्या मुलाला राजकारणात आणले आणि मोदी यांनी सांगितलेल्या कामाची सुरुवात इचलकरंजीतून केली, असा टोला माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी आपल्या भाषणात आवाडे यांना लगावला.
विणकरांनी आधुनिकतेचा स्वीकार करावाविणकरांनी पारंपरिक व्यवसायाच्या मागे न लागता बदल केला पाहिजे. टेक्निकल टेक्स्टाइलला भवितव्य आहे. शहरामध्ये सुमारे पाच हजार अत्याधुनिक यंत्रमाग येत आहेत. त्यांची नोंदणीही करण्यात आली आहे. हे यंत्रमाग उभारण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. विजेचा प्रश्नही लवकरच सुटणार आहे आणि वस्त्रोद्योग मंदीच्या चक्रव्यूहातून बाहेर पडणार आहे.