लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’साठी विरोधी आघाडीकडे इच्छुकांची मांदियाळी असल्याने नेत्यांची डोकेदुखी ठरणार हे निश्चित आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर बंडाळी होणार, ते टाळण्यासाठी माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत पॅनेल गुलदस्त्यात ठेवण्याची व्यूहरचना विरोधी आघाडीच्या नेत्यांची आहे. पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह मंत्री पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके व विश्वास पाटील यांचीही रविवारी बैठक झाली.
खासदार संजय मंडलिक हे संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने ‘गोकुळ’च्या चर्चेत सहभागी नव्हते. ते शनिवारी रात्री कोल्हापुरात आल्यानंतर घडामोडींनी वेग घेतला. रविवारी दुपारी मंत्री पाटील, खासदार मंडलिक व आमदार आबिटकर यांची बैठक झाली. यामध्ये एकूण पॅनेलची रचना, कोणाला किती जागा द्याव्या लागतील, यासह इतर महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा झाली. विरोधी आघाडीकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने नाराजांची संख्याही वाढणार आहे. ती थोपविताना नेत्यांची दमछाक होणार आहे. ते टाळून विरोधाची धार कमी करायची झाल्यास पॅनेल शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवावे, असा मतप्रवाह पुढे आला आहे. माघारीच्या शेवटच्या क्षणी पॅनेल जाहीर केल्याने इच्छुक इतरांच्या हाताला लागणार नाहीत, त्यामुळे बंडाळी शमविण्यात यश येईल, अशी अटकळ विरोधी आघाडीच्या नेत्यांची आहे.
दरम्यान, रविवारी सकाळी मंत्री सतेज पाटील, चंद्रदीप नरके व विश्वास पाटील यांची करवीर तालुक्यातील जागा वाटपाबाबत बैठक झाली. येथे विश्वास पाटील व नरके यांनी दोन जागांवर आग्रह धरल्याचे समजते. करवीरला पाच जागा मिळणार असून, त्यामध्ये विश्वास पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगुले यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. चौथी जागा ‘शेकाप’ला मिळू शकते. पाचवी जागा मंत्री पाटील ‘दक्षिण’मध्ये टाकू शकतात.
यड्रावकर, माने यांच्याशी आज चर्चा
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने यांच्याशी आज, सोमवारी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ चर्चा करणार आहेत.
सत्ताधाऱ्यांच्या गाठीभेटी सुरू
एकीकडे विरोधकांच्या बैठकांवर बैठका सुरू असताना सत्तारूढ गटाचे संचालक मात्र ठरावधारकांच्या गाठीभेटीत व्यस्त आहेत. थेट मतदारांना भेटून पाच वर्षांत केलेल्या कामाची माहिती ते देत आहेत.