कोल्हापूर : यूथ डेव्हलपमेंट को-आॅप. बॅँकेने बड्या थकबाकीदारांची नावे डिजीटल फलकावर झळकली आहेत. शाखांसह अनेक ठिकाणी हे फलक लावण्यात येणार आहेत. अनेक बड्या धेंडांकडे लाखो रुपयांची थकबाकी असल्याने बॅँक अडचणीत आली आहे. गेल्या महिन्याभरात सहा कोटींची वसुली झाली असून, अजून पाच कोटी वसुलीचे आव्हान बॅँकेच्या संचालकांना पेलावे लागणार आहे.
यूथ बॅँकेच्या ठेवी व कर्जाचे वाटपाच्या प्रमाणावर आक्षेप नोंदवत रिझर्व्ह बॅँकेने व्यवहारावर निर्बंध आणले. सहा महिन्यांत ठेवीदारांना केवळ पाच हजार रुपये काढता येतील, असे निर्बंध घातले. बॅँकेची १७ कोटींची थकबाकी असल्याने त्याच्या वसुलीचे आव्हान संचालक मंडळासमोर आहे. त्यानुसार गेले महिनाभर बॅँकेकडून वसुली मोहीम युध्दपातळीवर राबविली आहे. आतापर्यंत सहा कोटींची वसुली झाली आहे. येत्या आठ-दहा दिवसांत आणखी पाच कोटी वसूल करावे लागणार आहेत.
या वसुलीसाठी संचालक व अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. थकबाकीदारांनी तारण दिलेल्या मालमत्तेच्या विक्रीची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून, कोणत्याही परिस्थितीत रिझर्व्ह बॅँकेचे निर्बंध उठवून ग्राहकांमध्ये पुन्हा विश्वासाचे वातावरण निर्माण करावे लागणार आहे. यासाठी उर्वरित थकबाकीदारांकडून जोरदार वसुलीची मोहीम राबवली आहे. थकबाकीदारांचे फोटो, नावे व थकीत रकमेसह डिजीटल फलकावर झळकवली आहेत. यामध्ये बड्या धेंडांचा समावेश असून, बॅँकेच्या शाखांच्या दारात लावली जाणार आहेत.