रुकडी / माणगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार यावर माणगाव (ता. हातकणंगले) येथे उपसरपंच राजू मगदूम व सामाजिक कार्यकर्ते नेमगोंडा मगदूम यांच्यात ५१ हजारांची पैज लागली होती. या पैजेत उपसरपंच राजू मगदूम हरल्याने त्यांनी पैजेची रक्कम येथील वैष्णवीदेवी मंदिरात नेमगोंडा मगदूम यांना दिली.
कर्नाटकातील निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार यावरून आवाडे गटाचे समर्थक उपसरपंच राजू मगदूम यांनी विविध पक्षांशी संबंधित असणारे नेमगोंडा मगदूम यांच्याशी पैज लावली होती. काँग्रेस पक्ष बाजी मारणार असे मत उपसरपंच मगदूम यांचे होते, तर नेमगोंडा मगदूम यांच्यामते भाजप बाजी मारणार असे होते.
पैजेची रक्कम येथील वैष्णवीदेवी मंदिरच्या विकासाकरिता देण्याचा लेखी करारही दोघांनी केला होता. या पैजेची चर्चा तालुक्यासह जिल्ह्यात सुरू होती. निकालानंतर भाजपने बाजी मारल्याचे स्पष्ट झाल्यावर उपसरपंच मगदूम यांनी पैजेची ५१ हजारांची रक्कम मंगळवारी रात्री माणगाव येथील वैष्णवीदेवी मंदिरात नेमगोंडा मगदूम यांच्याकडे सुपूर्द केली.
नेमगोंडा मगदूम यांनी ही रक्कम येथील मंदिरच्या विकासाकरिता तत्काळ पदाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली. याप्रसंगी उदय स्वामी, सतीश महाजन, उमेश जोग, नेमगोंडा मगदूम हे उपस्थित होते.कर्नाटक विधानसभेत कोणता पक्ष बाजी मारणार यावरून माणगाव येथे ५१ हजारांची पैज लागली होती. उपसरपंच राजू मगदूम यांनी ही पैजेची रक्कम नेमगोंडा मगदूम यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी उदय स्वामी, सतीश महाजन, उमेश जोग, आदी उपस्थित होते.