कागल : हरितक्रांतीचा वरदहस्त ठरणाऱ्या आंबेओहळ प्रकल्पाचे "रामकृष्ण जलाशय" असे नामकरण स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात आले आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे रामनवमीला आपला वाढदिवस साजरा करतात. म्हणून या श्रद्धेपोठी श्रीरामाचे नाव तसेच बाबासाहेब कुपेकर यांचे नाव कृष्णराव होते. म्हणून श्री कृष्ण असे रामकृष्ण हे नामकरण करण्यात आले आहे. या जलाशयाचे नामकरण केल्याची प्रतिमा या शेतकऱ्यांनी आज मंत्री हसन मुश्रीफ यांना प्रदान केली.
२२ वर्षांपूर्वी स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली होती. परंतु पुनर्वसनामधील अडचणी व इतर अडचणी यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वाला येण्यास वेळ लागला. मंत्री मुश्रीफ यांनी याचवर्षी घळभरणी करून या पावसाळ्यात पाणी अडवणार, अशी घोषणा केली होती. या दोन नेत्यांच्या योगदानातून हा प्रकल्प साकारला म्हणून असे नाव दिल्याचे सुनील दिवटे यांनी सांगितले. उत्तूर विभाग व गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव-गिजवणे विभागातील २२ गावांचा या जलाशयाच्या लाभक्षेत्रामध्ये समावेश आहे. सातपैकी सहा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पूर्ण झाले आहेत, तर एकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तेही लवकरच पूर्ण होईल. असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
फोटोओळी ............ आंबेओहळ प्रकल्पाच्या "रामकृष्ण जलाशय" अशा नामकरणाची प्रतिमा मंत्री मुश्रीफ यांना वडकशिवाले येथील सुनील दिवटे व मुमेवाडी येथील बबन पाटील यांनी आज प्रदान केली.