संदीप आडनाईककोल्हापूर : पन्हाळ्याचे नाना बांदिवडेकर. निवृत्त पोलीस अधिकारी. देशाच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाचे साक्षीदार असलेले नाना बांदिवडेकर यांनी आपला अनुभव ‘लोकमत’कडे कथन केला.
१५ आॅगस्ट १९४७ रोजी देशाच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभलेले नाना बांदिवडेकर आज निवृत्तीनंतर पन्हाळा येथे वास्तव्यास आहेत. गेल्या २0 वर्षांपासून ते पन्हाळा येथील सज्जा कोठी येथे होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्व समारंभाला आवर्जून हजेरी लावतात.
नाना बांदिवडेकर यांनी आज ९८ वर्षे पार केली आहेत. १९२0 मध्ये त्यांचा जन्म झाला. कोल्हापूर स्टेट असताना १९४३ मध्ये ते पोलीस दलात दाखल झाले. १५ आॅगस्ट १९४७ रोजी ते गडहिंग्लज येथील पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक होते. स्वातंत्र्यदिनाच्या पहिल्या ध्वजारोहण समारंभात त्यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्याचा सन्मान त्यांना लाभला होता. राष्ट्रध्वजाला त्यांनी सर्वप्रथम सलाम केला. ‘हा माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा अविस्मरणीय क्षण होता. तेव्हा मी खूपच आनंदी आणि उत्साहाने भारलेलो होतो. या समारंभाला उपस्थित असलेल्या सर्वच गडहिंग्लजच्या नागरिकांशी मी हस्तांदोलन करून त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या,’ अशा शब्दांत ते आपला अनुभव सांगत होते. नाना बांदिवडेकर यांचा गेल्या वर्षी सर्वांत ज्येष्ठ पोलीस अधिकारी म्हणून पन्हाळा पोलिसांनी सत्कार केला आहे. याशिवाय पन्हाळाभूषण, सीनिअर सिटीझन असे काही पुरस्कारही मिळालेले आहेत. नानांना त्यांच्या सेवाकाळात पंडित जवाहरलाल नेहरू आणि लालबहाद्दूर शास्त्री या पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत सहभागी होण्याचा मान मिळाला आहे.
प्रभातफेरी, ध्वजारोहण सोहळ्यात सहभागीज्येष्ठ चित्रकार विश्रांत पोवार यांनीही पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याचा अनुभव ‘लोकमत’कडे व्यक्त केला. ते आज सीमाभागात असलेल्या खडकलाट गावचे. कोल्हापुरातील भक्तिसेवा विद्यापीठ माध्यमिक शाळेची शाखा तेथे नुकतीच सुरूझालेली होती. ते या शाळेत पाचवीत शिकत होते. तो काळ स्वातंत्र्य चळवळीने भारून गेलेला होता. काँग्रेस सेवादलाच्या शाखेमार्फत प्रभातफेºया निघायच्या, त्यात मी भाग घेई. गावातील सुभाष चौकात ध्वजारोहनाचा समारंभ पार पडला. त्याचा मी साक्षीदार आहे. ‘भारतमाता की जय! ’ या गजरात तो समारंभ पार पडला. बापू पवार आणि बेबी पडळकर या विद्यार्थ्यांनी गायिलेल्या गर्जा जयजयकार हे प्रेरणागीत अजूनही मनात रुंजी घालते, असे विश्रांत पोवार म्हणतात. स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा परशुराम साळुंके, निजाम काझी, मलगोंडा व चनगोंडा पाटील, आदींचा सहवास लाभल्याचे पोवार यांनी सांगितले.