कोल्हापूर : शेखर कुलकर्णी. एका खासगी कंपनीत नोकरी. लॉकडाउनच्या काळात त्यांना घरात अपघात झाला. एक ऑपरेशन झाले. दुसऱ्या ऑपरेशनसाठी पैसे नव्हते. मात्र ख्यातनाम अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबतचा शेखर यांचा फोटो आणि त्यांची व्यथा सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्याची दखल घेत नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम संस्थेनं शेखर यांना मदतीचा हात दिला.सोशल मीडियाचा वापर किती विधायक पद्धतीनं होऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण. शेखर आणि त्यांची आई जरगनगरमध्ये राहतात. शेखर कोल्हापुरातील एका उद्योगपतींकडे नोकरीला होते. लॉकडाऊनमुळे काळात घराबाहेरील लोखंडी जिन्यावरून तोल जाऊन ते खाली पडले. डोक्याला गंभीर इजा झाली. एक पाय आणि एक हात लुळा पडला होता. धड बोलताही येत नव्हते. अंथरुणालाच खिळून. परिस्थिती अगदी बिकट बनली.छत्रपती शहाजी कॉलेजचे प्रा. एम. टी. पाटील यांनी समाजमन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेश गावडे आणि सतीश वणिरे यांना याची माहिती दिली. हे दोघेही त्यांच्या घरी जाऊन आले. शेखर जिथे नोकरीला होते त्यांच्याकडे एकदा नाना पाटेकर आले होते. त्यांच्यासोबत त्यांनी फोटोही काढला होता.
महेश गावडे यांनी हा फोटो आणि सर्व परिस्थिती फेसबुकच्या माध्यमातून शेअर केली. ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनीही पाटेकर यांच्या कानांवर ही बाब घातली आणि चक्क पाटेकर यांचा महेश गावडे यांना फोन आला. ऑपरेशनच्या खर्चाची जबाबदारी त्यांनी उचलली. ऑपरेशन यशस्वी झाले. शेखर यांना डिस्चार्जही मिळाला.सावलीच्या किशोर देशपांडे यांनी ऑपरेशनच्या आधी शेखर यांच्यावर फिजिओथेरपीचे उपचार केले. दरम्यानचा त्यांचा सर्व खर्च केला. समाजमनचे सचिव बाळासाहेब उबाळे यांच्याकडे कोल्हापूर बहुजन पत्रकार संघाने काही मदत दिली आहे. तीदेखील कुलकर्णी यांना दिली जाणार आहे.