हलकर्णी : समोरून येणाऱ्या ट्रकने मारलेल्या लाइटच्या तीव्र प्रकाशामुळे दुचाकीस्वारचा ताबा सुटून रस्त्याकडेच्या रोडरोलरला दुचाकीने दिलेल्या जोराच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा अंत झाला. या अपघातात अशोक करगोन्नावर (वय ३४) व बसवराज कलगोंडा (वय २८, दोघेही रा. नंदनवाड, ता. गडहिंग्लज), अशी मयतांची नावे आहेत. हत्तरकी- हिडकल डॅम रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ रात्री ९ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
अधिक माहिती अशी, अशोक व बसवराज हे दोघेही दुचाकीवरून शिंदेहट्टी येथील यात्रेनिमित्त मंगळवारी (२०) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास शिंदेहट्टी येथील नातेवाइकांकडे जात होते.
दरम्यान, हत्तरकी- हिडकल डॅम रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने लाइट दिल्याने दुचाकी बाजूला घेण्यात नादात दुचाकीने रोडरोलरला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामध्ये अशोक याचा जागीच, तर बसवराज याचा बेळगावच्या केएलई रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
बुधवारी (२१) दुपारी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अशोक यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, दोन मुले, तर बसवराज यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, असा परिवार आहे.
अशोक हे ६ वर्षांपासून ग्रामपंचायतीमध्ये, तर बसवराज हे ८ वर्षांपासून नंदनवाड बलभीम सेवा संस्थेत शिपाई म्हणून कार्यरत होते.
सामान्य कुटुंबातील दोघा कर्त्या व्यक्तींच्या दुर्दैवी मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद हत्तरकी पोलिसांत झाली आहे.
-------------------------
एक नवविवाहित,
दुसरा लहान मुलांचा बाप
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बसवराज यांचा सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. अशोक यांना ९ वर्षांचा मुलगा, तर ७ वर्षांची मुलगी, अशी दोन लहान मुले आहेत.
--------------------------
तो रोडरोलर नसता तर...
हत्तरकी- हिडकल डॅम हा नेहमी रहदारीचा रस्ता आहे. हुक्केरी- गोकाक या मुख्य गावासह कर्नाटकातील अन्य खेडेगावांत जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. रस्ता सपाटीकरणासाठी रोडरोलर याठिकाणी आणण्यात आला आहे. ८ दिवसांपासून हा रोडरोलर रस्त्याकडेला उभा आहे. मात्र, रस्त्याकडेचा रोडरोलर दोघांच्याही आयुष्यात काळ बनून आल्याची चर्चा परिसरात होती.
-------------------------
अशोक करगोन्नावर : २१०४२०२१-गड-१३
बसवराज कलगोंडा : २१०४२०२१-गड-१४