गडहिंग्लज : राजकारणाशी व आंदोलनाशी संबंध नसतानाही ‘एव्हीएच’विरोधी आंदोलनाचे नेतृत्व डॉ. नंदाताई बाभूळकर यांनी समर्थपणे पेलले आहे. त्यांच्या सासरच्या व माहेरच्या मंडळींनी तयारी दाखविल्यास त्या चंदगडच्या भावी आमदार झाल्या, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असे मत नोंदवत ‘चंदगड’च्या भावी आमदार ‘नंदाताई’च होतील, असे भाकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी शनिवारी केले. गडहिंग्लज शहरातील ४ कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला. त्यानंतर पालिकेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नगराध्यक्ष लक्ष्मी घुगरे, प्रा. विठ्ठल बन्ने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी नंदातार्इंच्या नेतृत्वाचे तोंडभरून कौतुकही केले. मुश्रीफ म्हणाले, आंदोलनात त्यांनी स्वत:हून अटक करून घेतली. त्या अभ्यासू व विद्वान आहेत. रणरागिणी ताराराणींच्या कर्तबगारीचा इतिहास जिल्ह्याला आहे. घरच्यांनी तयारी दाखविली, तर त्या नक्कीच आमदार होतील. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी ‘एव्हीएच’ प्रकल्पाच्या फेरतपासणीचा प्रस्ताव केंद्राला पाठविण्याचे आश्वासन विधानसभेत दिले आहे. प्रकल्पासाठी कोट्यवधीचा खर्च झाल्यामुळे कंपनी न्यायालयात जाऊ शकते. प्रकल्पाच्या हद्दपारीसाठी मोठ्या जनसंघर्षाचीच गरज आहे. जनक्षोभ लक्षात घेऊन प्रकल्प रद्द करण्याचा शहाणपणा ‘त्यांनी’ दाखवावा, असे ते म्हणाले.
‘चंदगड’च्या भावी आमदार ‘नंदाताई’च
By admin | Published: March 22, 2015 1:08 AM