लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीच्या छाननीत अपात्र ठरवलेले यशवंत नांदेकर, भारती डोंगळे व अजित पाटील हे विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांच्याकडे दाद मागणार आहेत. संघाच्या २१ जागांसाठी २४१ जणांचे ३९० अर्ज वैध ठरले असून ७५ जणांचे ९२ अर्ज अवैध ठरले.
‘गोकुळ’साठी दाखल झालेल्या ४८२ अर्जांची सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी छाननी केली. यामध्ये दूध पुरवठा व पशुखाद्याच्या अटीने अनेकांच्या दांड्या गुल झाल्या. सोमवारी रात्री उशिरापर्यंत ‘अपात्रतेचे आदेश’ तयार करण्यात आले. छाननीमध्ये भारती डोंगळे, यशवंत नांदेकर, अजित पाटील यांचे अर्ज दूध पुरवठ्याच्या अटीवर अपात्र ठरवण्यात आले. याविरोधात विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांच्याकडे दाद मागणार आहेत.
हत्तरकी, वनिता पाटील यांचे एकेक अर्ज वैध
महिला गटातून श्वेता हत्तरकी यांनी दोन तर वनिता पाटील यांनी तीन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी हत्तरकी यांचा एक तर पाटील यांचे दोन अर्ज अवैध ठरले. त्यामुळे दोघींचाही एकेक अर्ज शिल्लक राहिला आहे.
पहिला दिवस माघारीविनाच
‘गोकुळ’ची छाननी झाल्यानंतर मंगळवारपासून अर्ज माघारीस सुरुवात झाली. मात्र, पहिल्या दिवशी एकानेही अर्ज माघारी घेतला नसल्याने पहिला दिवस माघारीविनाच गेला.
तीन दिवसांत अपील गरजेचे
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एखाद्याला पात्र ठरवले आणि त्यावर हरकत घ्यायची झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागावी लागते. जर अपात्रतेविरोधात दाद मागायची झाल्यास विभागीय उपनिबंधकांकडे जावे लागते. तेथेही छाननीच्या निर्णयानंतर तीन दिवस मुदत असते.
असे शिल्लक राहिले गटनिहाय अर्ज
गट अर्ज उमेदवार
सर्वसाधारण २४३ १३८
महिला राखीव ६७ ४८
इतर मागास ५३ ३६
भटके विमुक्त १३ १०
अनुसूचित जाती १४ ०९
कोट-
सलग पाच वर्षे प्रतिवर्षी ४० हजार लिटर दूध पुरवठ्याची अटीचा अर्थ चुकीचा लावला आहे. जर एखादी संस्था सभासद होऊन चार वर्षे झाली असतील तर त्या संस्थेने ही अट कशी पूर्ण करायची, यासह अनेक मुद्द्यांवर दाद मागणार आहे.
- अजित पाटील (परिते)