चंदगड/गडहिंग्लज : बा रे पांडुरंग केव्हा भेट देशी, झालो मी परदेशी तुजविन। का माझा विसर पडिला माय-बापा, सांडियेली कृपा कवण्यागुणे।। कैसा कंटोनिया राहू हा संसार। काय एक धीर देऊया मना।। भले तरी देऊ काशेची लंगोटी, ‘नाठाळा’च्या माथी हाणू काठी।। अशा अभंगांच्या माध्यमातून वारकऱ्यांनी, तर पेटलेल्या मेणबत्त्या हाती घेऊन कँडल मार्चद्वारे महाविद्यालयीन युवक-युवतींनी ‘एव्हीएच’ कंपनीला ‘चंदगड छोडो’चा इशारा मंगळवारी (दि. ३) दिला.विनाशकारी एव्हीएच प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील वारकऱ्यांच्या सुमारे ५०० दिंड्या सकाळी पाटणे फाट्यावर आल्या. टाळ-मृदंगाच्या गजरात कंपनीच्या प्रकल्पस्थळापर्यंत आणि प्रवेशद्वारी ठिय्या मांडून त्यांनी निरनिराळ्या अभंगातून कंपनीला चंदगड सोडण्याचा इशारा देत माय-बाप सरकारला साकडे घातले.सायंकाळी पेटलेल्या मेणबत्त्या हाती घेऊन पाटणे फाट्यापासून हजारो महाविद्यालयीन मुला-मुलींनी कंपनीच्या कार्यस्थळापर्यंत कँडल मार्च काढला. कंपनीच्या गेटवर त्यांनी बसून निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या.आंदोलनात आमदार संध्यादेवी कुपेकर, कृती समितीचे अध्यक्ष प्रा. एन. एस. पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष एम. जे. पाटील, डॉ. नंदिनी बाभूळकर, डॉ. बी. एल. पाटील, रामराजे कुपेकर, अशोक देसाई, जिल्हा परिषदेच्या सदस्या सुजाता पाटील, पंचायत समितीच्या सदस्या अनुराधा पाटील व नंदिनी पाटील, अॅड. संतोष मळवीकर, दिशा सामाजिक संस्थेच्या विद्या तावडे, विष्णू गावडे, अमर चव्हाण, गजानन पाटील, बसवंत अडकूरकर, प्राचार्य पी. आर. पाटील, प्रा. पी. ए. पाटील, शिवाजी सावंत, तुकाराम वार्इंगडे, संजय पाटील, नारायण गावडे, सोमनाथ हारकारे, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
‘नाठाळा’च्या माथी हाणू काठी !
By admin | Published: February 03, 2015 11:28 PM