कोल्हापूर : मुख्यमंत्री चंदगडविधानसभा मतदारसंघ हा भाजपकडे घेतील आणि तेथून आपल्यालाच उमेदवारी मिळू शकेल, अशी आशा अजूनही डॉ. नंदिनी बाभूळकर यांना वाटत आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी व तुमच्यासाठीच आपल्याला भाजपमध्ये जायचे आहे, तुम्ही मला साथ द्या, असे त्या कार्यकर्त्यांना सांगत आहेत.गडहिंग्लज शासकीय विश्रामगृहात रविवारी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्याचेही समजते; परंतु गडहिंग्लजमधील राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाण्यास विरोध दर्शविल्याची माहिती आहे. त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता, त्यांच्या स्वीय साहाय्यकाने ‘ताई बैठकीत व्यस्त असल्याचे सांगितले.’गेल्या निवडणुकीत ही जागा शिवसेनेकडून माजी आमदार नरसिंगराव पाटील यांनी लढवून दुसऱ्या क्रमांकाची ४३,४०० मते मिळविली होती. त्यामुळे शिवसेनेने या जागेवरील दावा अजून सोडलेला नाही. जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार आणि दोन खासदार आहेत. भाजपचे दोन आमदार असून कागल व चंदगड या दोन्ही जागा आपल्याला मिळाव्यात, असा भाजपचा आग्रह आहे; परंतु शिवसेनेने त्यास संमती न दिल्याने बाभूळकर यांचा भाजप प्रवेश रखडला आहे.
हा गुंता सुटला असता तर माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबतच त्यांचाही भाजप प्रवेश होणार होता; परंतु प्रवेश केला आणि मतदारसंघ शिवसेनेने सोडलाच नाही तर अडचणी येतील म्हणून त्यांनी सावध भूमिका घेतली. भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी दिली तर आम्हाला गृहित धरू नका, असा पवित्रा भाजपमधील सर्व इच्छुकांनी घेतला. हे लक्षात आल्याने डॉ. बाभूळकर यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही मुंबईत जाऊन भेट घेतल्याचे सांगण्यात येते; परंतु तिथेही त्यांना फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.
त्या पक्षातून त्यांचेच चुलतबंधू संग्राम कुपेकर यांच्यासह सुनील शिंत्रे, प्रभाकर खांडेकर हे इच्छुक आहेत. राजेश पाटील हे देखील शिवसेनेच्या उमेदवारीचे नैसर्गिक हक्कदार आहेत. कारण गेल्या निवडणुकीत त्यांचे वडीलच उमेदवार होते. त्यामुळे बाभूळकर यांच्या उमेदवारीचा निर्णय लटकला आहे. त्यांचे सासर नागपूर असल्याने त्या संपर्कातून मुख्यमंत्र्यांकडून ही जागा आपल्याला नक्की मिळेल, असे त्यांना अजूनही वाटते.बाभूळकर विरुद्ध राजेश पाटीलहा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला नाही तर त्यांना पुन्हा राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हातात बांधण्याशिवाय बाभूळकर यांच्यासमोर पर्याय नाही. भाजपची उमेदवारी ही आजच्या घडीला तरी ‘जर-तर’ची गोष्ट आहे. भाजपकडे जिल्ह्यात कमी जागा आहेत, सत्तेचा समतोल या गोष्टी कितीही महत्त्वाच्या असल्या तरी जेव्हा दोन पक्ष आघाडी करतात तेव्हा एखाद्या जागेसाठी किती प्रतिष्ठा पणाला लावायची यालाही मर्यादा येतात.
विद्यमान आमदारांची संख्या जास्त असल्याने भाजपला मुळातच नव्याने कमी जागा वाट्याला येणार आहेत. त्यात त्या पक्षाने राज्यभर अनेक मतदारसंघांत उमेदवारीची आश्वासने दिली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री किती ताकद लावतात, यावरच हा गुंता सुटणार आहे. त्यांना कमळ मिळालेच तर बाभूळकर विरुद्ध राष्ट्रवादीकडून राजेश नरसिंगराव पाटील अशी लढत होऊ शकते.