असीफ कुरणेबंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नंदिनी विरुद्ध अमूल असा दुधाचा वाद पेटला आहे. नंदिनी हा कर्नाटक राज्य सरकारच्या दूध महासंघाचा ब्रँड तर अमूल हा गुजरातमधील देशपातळीवरचा प्रसिद्ध ब्रँड आहे.
५ एप्रिल रोजी अमूलने बंगळुरू शहरात ऑनलाइन दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्याचे ट्वीट केले आणि निवडणुकीच्या तोंडावर बाहेरचा विरुद्ध आपला असा वाद पेटला आहे. सोशल मीडियावर गो बँक अमूल, सेव्ह नंदिनी हे हॅशटॅग चालत आहेत. तामिळनाडूतील दही वाद ताजा असताना कर्नाटकात आता दुधाच्या वादाला उकळी फुटली आहे.काँग्रेस आणि संयुक्त जनता दल (जेडीएस) यांनी अमूलच्या प्रवेशाला विरोध केला आहे. भाजप सरकार कन्नड शेतकऱ्यांची अस्मिता आणि ब्रँड संपवू पाहत आहे. भाजप सरकार मागील दाराने अमूल राज्यात आणू पाहत असून राज्यात दुधासंदर्भात स्वत:चा चांगला ब्रँड असताना बाहेरच्या कंपनीला राज्यात आणण्याची काय गरज, असा सवाल काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी केला. भाजप नंदिनी अमूलला विकण्याचे षडयंत्र रचत आहे, असा आरोप काँग्रेसने लावला आहे.यावर विरोधी पक्ष विनाकारण यात राजकारण आणत आहेत. राज्यात सध्या १८ विविध प्रकारच्या कंपन्या दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायात आहेत. मग आताच हा वाद का, नंदिनी मोठा ब्रँड असून अमूलशी स्पर्धा करण्यास सक्षम आहे, असा दावा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला. हिंदी भाषेच्या मुद्यानंतर आता अमूलच्या मुद्यावरून विरोध पक्ष कन्नड अस्मितेचा प्रश्न उचलत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोडांवर भाजपला हा मुद्दा अडचणीचा ठरू शकतो.दुधाच्या किंमती वाढण्याची शक्यतानंदिनी हा कर्नाटक मिल्क फेडरेशनचा ब्रँड असून दररोज राज्यभरात २३ लाख लिटरचे संकलन केले जाते. बंगळुरू शहरातील बाजारपेठेत नंदिनीचा वाटा जवळपास ७० टक्के एवढा आहे. नंदिनीचे दूध हे स्वस्त असून त्याचा दर ३९ लिटर रुपये एवढा आहे. त्यामुळे विक्रीदेखील जास्त होते. दररोज कर्नाटकात नंदिनी ३३ लाख लिटर दुधाची विक्री करते. त्यातुलनेत अमूलचे टोंड दूध ५४ रुपये लिटर आहे. अमूलचा कन्नड बाजारपेठेत प्रवेश झाल्यावर दुधाच्या किमती वाढतील, अशी शक्यतादेखील व्यक्त केली जात आहे.