कोल्हापूर : नंदवाळ (ता. करवीर) येथे भारत राखीव बटालियनच्या मैदानावर गोल रिंगण सोहळा करण्यास पोलिसांनी विरोध दर्शविला. यावेळी ग्रामस्थांनी शासनाच्या निषेधार्थ या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले. दरम्यान ग्रामस्थांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करुन जमाव पांगवला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांचे सुरक्षा कडे तोडून ग्रामस्थांनी आरक्षित मैदानावर जाऊन पालखी सोहळा पार पाडला.नंदवाळ (ता. करवीर) येथील विठ्ठल मंदीरात आठवडाभर हरिनाम सप्ताह सुरु आहे. गावातील भारत राखीव बटालियनच्या आरक्षित मैदानावर रिंगण सोहळा व दिंडीचे आयोजन केले होते. या सोहळ्यास प्रशासनाने विरोध केला. त्यासाठी गेले तीन दिवस जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, बटालियनचे अधिकारी यांच्याशी ग्रामस्थांशी चर्चेच्या फेऱ्या सुरु होत्या. पण त्याच जागेत हा सोहळा करण्यावर ग्रामस्थ ठाम होते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.सोमवारी सकाळी गावातच उभे रिंगण व दिंडी हा धार्मिक सोहळा झाला. आरक्षित मैदानावर सोहळा करण्यास विरोध करणाऱ्या शासनाचा माजी आमदार चंद्रदीप नरके, करवीर पंचायत समिती माजी सभापती राजू सुर्यवंशी, सरपंच अस्मिता कांबळे, यात्रा समिती अध्यक्ष जोतिराम पाटील, शेतकरी संघटेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, भोगावती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष हंबीरराव पाटील व ग्रामस्थांनी निषेध नोंदवून मैदानाशेजारी ठिय्या आंदोलन केले.आरक्षित मैदानावर जाण्यासाठी विरोध केल्याने ग्रामस्थांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याने गोंधळ उडाला. अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यामुळे जमाव पांगला, तरीही ग्रामस्थांनी पोलिसांचे सुरक्षा कडे तोडून आरक्षित मैदानावर जाऊन पालखी सोहळा केला.
Nandwal ringan sohala: नंदवाळमध्ये रिंगण सोहळ्यावरुन पोलीस-ग्रामस्थांमध्ये धक्काबुक्की, पोलिसांनी केला लाठीमार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 2:52 PM