नूल : नरेवाडी (ता. गडहिंग्लज) गावामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन बाधितांचा मृत्यूपासून बचाव करण्यासाठी वाफेची अनोखी सोय करण्यात आली आहे. गावात आतापर्यंत ९ बाधितांपैकी ६ बाधितांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थ व ग्रामपंचायत खडबडून जागी झाली आहे.
गावामध्ये सरासरी ९० टक्के कुटुंबांतील एकतरी सदस्य हा मुंबईस्थित आहे. गेल्या दोन महिन्यांत मुंबईकरांची वर्दळ वाढल्यामुळे गाव बाधित झाल्याची चर्चा आहे; परंतु परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, तसेच ‘आम्ही नरेवाडीकर’ तसेच इतर स्थानिक व्हॉटस्अॅप ग्रुपच्या माध्यमातून ऑनलाइन बैठकांच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधासाठी तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
गॅस कूकरच्या साहाय्याने रामलिंग देवालय, होळीचा खूट, आनंदा आसवले, नेताजी कुराडे, संजय बिरंजे या ५ ठिकाणी वाफ देण्याची सोय करण्यात आली आहे. सॅनिटायझरचा पुरवठा, दुकाने, दूध संस्था यांच्यासाठी निर्बंध घातले आहेत.
कोरोना मृत्यूमध्ये मुंबईस्थित तिघे, तर स्थानिक तिघांचा समावेश आहे. आणखी तिघा बाधितांवर गडहिंग्लज येथे उपचार सुरू आहेत, अशी माहितीही सरपंच अंकुश रणदिवे यांनी दिली.
--------------------------------------------
फोटो ओळी : नरेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे गावात विविध ठिकाणी वाफेची अशी सोय करून कोरोनाबाधितांसह अन्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे.
क्रमांक : ०२०५२०२१-गड-०३