भारत चव्हाण
कोल्हापूर : कोल्हापूर-राधानगरी हा रस्ता पुढे दाजीपूरमार्गे कोकणला जोडणारा एक प्रमुख रस्ता आहे. तरीही गेल्या अनेक वर्षांत या रस्त्याचे रुंदीकरण किंवा रस्त्याच्या बाजूपट्ट्या वाढविण्याचे काम झाले नसल्याने दररोज हजारो वाहनांचा भार सोसणारा हा रस्ता अरुंद आणि गैरसोयीचाच अधिक झाला आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे तर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे, शिवाय लवकरच साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होत असल्याने ऊस वाहतूकही वाढणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरून आसपासच्या गावांतील, तसेच शहरातील नागरिकांना प्रवास करणे म्हणजे एक प्रकारची डोकेदुखीच ठरणार आहे.
- कोल्हापूर-गगनबावडा, तसेच कोल्हापूर-आजरा, आंबोली मार्गे कोकणात जाणाऱ्या रस्त्यांना एक उत्तम आणि सोयीचा पर्यायी रस्ता म्हणून कोल्हापूर-राधानगरी-दाजीपूर या रस्त्याकडे पाहिले जाते. या रस्त्यावर राधानगरीपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे; परंतु कोकणात उतरणाऱ्याची संख्या तशी कमीच आहे. याला कारण म्हणजे कोल्हापूर-राधानगरी-दाजीपूर या रस्त्याची झालेली चाळण होय. वाहतुकीच्यादृष्टीने अतिशय खराब रस्ता म्हणून त्याच्याकडे बोट दाखविले जाते.
वास्तविक दोन जिल्ह्यांना जोडणारा आणि अन्य दोन रस्त्यांवरील भार हलका करणारा कोल्हापूर-राधानगरी-दाजीपूर हा रस्ता अतिशय उत्तम पद्धतीने विकसित करण्याची आवश्यकता होती; पण गेल्या काही वर्षांत तरी तसे प्रयत्न कोणी केल्याचे दिसत नाही. यामध्ये जसा शासकीय अधिकारी वर्गाचा, तसेच राजकारणी मंडळींचाही उदासीन दृष्टिकोन आहे.
कोल्हापूर शहरात प्रवेश करताना हा रस्ता तर अधिकच अरुंद आहे. पुईखडीचा नागमोडी रस्ता उतरून खाली आलो की, ए वन गॅरेज लागते. तेथून हा रस्ता ‘आयआरबी’ने चुकीच्या पद्धतीने केला. प्रत्यक्षात पूर्व नियोजित आराखड्यात क्रेशर चौकापर्यंत हा रस्ता शंभर फुटांचा होता; परंतु तो अवघा ६० फुटांचा झाला.
शहराच्या अनेक प्रवेशद्वाराचे रस्ते हे शंभर फुटांचेच आहेत; मग एकट्या राधानगरी रस्त्याने कोणाचे घोडे मारले होते? हा प्रश्न पडतो. ए वन गॅरेजपासून क्रेशर चौकापर्यंतचा रस्ता अवघ्या ६० फुटांचा झाल्यामुळे त्यावरील वाहनांच्या गर्दीतून वाट काढत जाणे म्हणजे एक दिव्यच आहे. त्यामुळे अस्ता अरुंद केल्याची चूक पटकन लक्षात येते. प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधींची ही चूक भविष्यकाळात वाहनधारकांना सहन करावी लागणार आहे.एका इमारतीसाठी मेजरमेंट बदललेक्रेशर चौक ते ए वन गॅरेज हे शहराचे प्रवेशद्वार आहे; पण या रस्त्याचे तीनतेरा वाजविले आहेत. सानेगुरुजी वसाहतीतून पुढे गेल्यावर एक बहुमजली इमारत लागते. या इमारतीच्या ठेकेदाराने केलेली चूक रस्त्याची रुंदी कमी करण्यास कारणीभूत ठरली. इमारत बांधणाºया व्यावसायिकांवर कारवाई होऊ नये म्हणून एका वजनदार मंत्र्याने ठेकेदाराला अभय देत शंभर फुटी रस्त्याचे मेजरमेंट बदलण्यास भाग पाडले. त्याचीच पुनरावृत्ती पुढे ‘आयआरबी’च्या कार्यकाळातही आली.
काही राजकारण्यांनी तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा रस्ता साठ फुटांचा कसा राहील याच संकुचित दृष्टीने पाहिले. त्याची साक्ष ‘आयआरबी’ने केलेल्या रस्ता लॅन्डमार्कवधरून पटते. हा रस्ता दोन्ही बाजूंनी किमान दहा-दहा फुटांनी वाढविला असता तर तो अधिक प्रशस्त झाला असता.
अपघाताची ठिकाणे :
- आपटेनगर चौक रस्ता
- ए वन गॅरेजजवळील खचलेला बाजूचा रस्ता
- कांडगांव ते देवाळे दरम्यानचे वळण
- हळदीजवळील नदीकडे जाणारा रस्ता व वळण
- हळदी येथील शिवाजी चौक
- देवाळे येथील वळण
अपघाताला निमंत्रण देणाऱ्या काही बाबी
- कोल्हापूर ते राधानगरी अरुंद रस्ता आहे.
- यंदाच्या पावसाळ्यात रस्ता अतिशय खराब झाला असून मोठे खड्डे पडले आहेत.
- रस्त्याच्या बाजूपट्ट्या मजबूत नसल्याने कडेला वाहन घसरण्याचा धोका.
- मुख्य रस्त्याला येऊन मिळणाऱ्या रस्त्यावर वाहने पटकन दिसत नाहीत.
राज्य मार्ग की जिल्हा मार्ग?कोल्हापूर ते राधानगरीमार्ग फोंडा हा राज्य मार्ग रस्ता आहे; परंतु या रस्त्याच्याबाबतीत राज्य मार्गाचे कोणतेही निकष पूर्ण केलेले नाहीत. एक तर हा रस्ता अतिशय अरुंद असून, बाजूपट्ट्या भरून घेतलेल्या नाहीत. रस्त्यावर सध्या कोठेही पट्टे मारलेले दिसत नाहीत. गाव आले की रस्त्यावर त्या त्या ठिकाणी अतिक्रमण झालेले पाहायला मिळते. एस. टी. महामंडळाने आपल्या प्रवाशांकरिता एकाही ठिकाणी थांबे निर्माण केलेले नाहीत. त्यामुळे प्रवासी रस्त्यावरच उन्हात, पावसात थांबलेले पाहायला मिळतात. त्यामुळे कोल्हापूर-राधानगरी हा राज्य मार्ग आहे की जिल्हा मार्ग आहे, असा प्रश्न पडतो.
हळदी गावाच्या मुख्य रस्त्यावर भाजी विक्रेते, टपऱ्या , खोकी तसेच वडापच्या वाहनांचे प्रचंड अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे एखादी एस. टी. किंवा ट्रक रस्त्यावर थांबला की वाहतूक ठप्प होते. बहुतेक सर्वच वाहने रस्त्यावर कशीही लावली जातात. त्यामुळे सकाळी व सायंकाळी पादचाऱ्याना साधे चालत जाणेही अवघड होऊन जाते. नदीवर महिला व जनावरे जातात; पण रस्ता एकदम वळणाचा असल्याने दोन्ही बाजूनी आलेले वाहन अजिबात दिसत नाही. त्यामुळे कधी तरी या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यताआहे.- राजाराम सुतार (हळदी)
देवाळे गावाच्या हद्दीतून वाहने वेगाने जातात. येथे दोन मोठ्या शाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्ता पार करणे अशक्य होते. रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्याने अपघाताची शक्यता आहे. रस्ता एकदमच अरुंद असल्याने एखादे वाहन रस्त्यावर थांबले की, मागची सगळी वाहनेही थांबतात. पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याच्याकडेला खुदाई करण्यात आली होती. त्यामुळे रस्ता खराब झाला आहे. परिणामी, वाहतुकीची कोंडी होते. वाहनधारकांना त्याचा खूप त्रास होत आहे.- तानाजी पाटील (देवाळे).
आपटेनगर येथे शहरातील एक मुख्य चौक असून येथे वाहतुकीची नेहमी गर्दी झालेली असते. केएमटी, एसटी बसेस जाग्यावरच थांबलेल्या असतात. काही टपऱ्या थेट रस्त्यावरच उभ्या केल्या असल्यामुळे बाजूने येणारी वाहने दिसत नाहीत. रस्त्यात असलेली अतिक्रमणे हटवून चौक प्रशस्त करण्यात आला पाहिजे. माल वाहतूक करणाऱ्या रिक्षा, टेम्पो यांना पार्किंगसाठी जागा करून दिली पाहिजे.- श्रीधर आंबी, आपटेनगर.
‘आयआरबी’ ए वन गॅरेजपासून रंकाळा क्रशर चौकपर्यंतचा रस्ता अरुंद केला आहे. प्रत्यक्षात शंभर फुटी असणारा हा रस्ता अवघा साठ फुटी झाला आहे. त्यामुळे भविष्यकाळात आजच्यापेक्षाही गंभीर समस्या निर्माण होणार आहे. अरुंद रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूकहोत असल्याने हा रस्ता नेहमी वर्दळीचा झाला आहे. रस्ता दुभाजकाला ठिकठिकाणी जागा ठेवल्यामुळे वाहने कोठूनही, कशीही रस्त्यात आडवी येतात.- उदय गायकवाड.(सानेगुरुजी वसाहत)