आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २२ : वारांगणांना शिवीगाळ केल्याच्या रागातून चौघांनी नाशिकच्या ठेकेदारासह दोघांना मारहाण करून त्यांच्या खिशातील दोन मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक केली. संशयित गुन्हेगार आकाश बाबासो बिरांजे (वय २४), निग्रो ऊर्फ संदीप धनाजी कांबळे (२४), मेहबूब इलाही खलिफा (२९, तिघे रा. कनाननगर), मेहबूब बशीर शेख (२७, रा. शाहूपुरी पाचवी गल्ली) अशी त्यांची नावे आहेत. ठेकेदार गणेश भरत ढगे (२५, सध्या रा. शिरोली एमआयडीसी, मूळ रा. रासेगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक) व राहुल नागेश पानढवळे (२०, रा. उस्मानाबाद) यांना रविवारी (दि. २१) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मारहाण झाली.
याबाबतची अधिक माहिती अशी, गणेश ढगे यांनी कोल्हापुरातील वीज मंडळाच्या इलेक्ट्रिक कामांचा ठेका घेतला आहे. ते रविवारी रात्री मित्र राहुल पानढवळे याला घेऊन कारमधून स्टेशन रोड परिसरात आले. याठिकाणी हॉटेलमध्ये जेवण करून ते रात्री साडेबाराच्या सुमारास एटीएममधून पैसे काढण्यासाठी व्हिनस कॉर्नर चौकात आले. तेथून परत उषा टॉकीज समोरील रस्त्यावर कार बाजूला उभी करून थांबले. तंबाखू खात उभे असताना त्यांची याठिकाणी उभ्या असलेल्या वारांगणांसोबत वादावादी झाली.
शिवीगाळ केल्याने वारांगणांनी रिक्षाचालक मेहबूब शेख याला याप्रकाराची माहिती फोनवरून दिली. तो सराईत गुन्हेगार आकाश बिरांजे, संदीप कांबळे यांना रिक्षात (एमएम ०७ सी २७००) घेऊन उषा टॉकीज येथे आला. यावेळी मेहबूब शेख याने गणेश ढगे व राहुल पानढवळे यांना थोड्या वेळापूर्वी माझ्या सासूला शिवीगाळ का केली? असा जाब विचारत मारहाण केली. बिरांजे व कांबळे याने ढगे याच्या बरमोडा पॅन्टच्या उजव्या खिशात जबरदस्तीने हात घालून दोन मोबाईल काढून घेतले. चौघांनी केलेल्या मारहाणीत ठेकेदार ढगेसह त्याच्या मित्राचे कपडेही फाटले होते. अशा अवस्थेत दोघेही शाहूपुरी पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांना याप्रकाराची माहिती दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन रिक्षामधून पळून जाणाऱ्या चौघांना पकडून पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याकडून दोन मोबाईल काढून घेतले.
संशयित बिरांजे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर लक्ष्मीपुरी, राजारामपुरी पोलीस ठाण्यात लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले करीत आहेत.
बाळाला जमिनीवर आपटण्याचा इशारा
दरम्यान, वारांगणांना सखी संघटनेच्या काही महिला सोमवारी सकाळी शाहूपुरी पोलीस ठाण्यात आल्या. त्यांनी ठेकेदार ढगे व त्याचा मित्र दारू पिऊन होते. त्यांनी आम्हाला शिवीगाळ करून मारहाण केली आहे. आमची फिर्याद घ्या, अशी मागणी केली. यावेळी पोलिसांनी या सर्वांना बाहेर काढले. एका महिलेच्या हातामध्ये दोन महिन्याचे बाळ होते. तिने संतप्त होऊन पोलीस आमच्यावर अन्याय करीत आहेत. आमच्या लोकांना सोडा, नाहीतर बाळ जमिनीवर आपटीन, अशी दमदाटी केली. तिच्या या इशाऱ्यावर पोलिसांनी सावध भूमिका घेत सर्वांना शांत केले.
ठेकेदाराची धूम
चौघाजणांनी मारहाण करून मोबाईल काढून घेतल्यानंतर भितीने ठेकेदार गणेश ढगे व त्याचा मित्र पोलीस ठाण्यात आले. त्यांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. पोलीस तत्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले. संशयित चौघांना घेऊन ते ठाण्यात आले. प्रकरण आपल्याही अंगलट येणार असल्याच्या भीतीने ठेकेदार मित्रासह कारमधून पसार झाल्याने पोलिसांची डोकेदुखी झाली. पहाटे चारपर्यंत पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर तो कसबा बावडा येथील एका मित्राच्या घरी मिळून आला. त्यानंतर फिर्यादी घेऊन गुन्हा दाखल केला.