विश्वास पाटीलकोल्हापूर : अपंग कल्याणाच्या कार्यात देशात नावाजलेली संस्था अशी ओळख असलेल्या येथील हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड या संस्थेमध्ये मतभेदांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. त्यातूनच संस्थेच्या उभारणीत आणि तिला नावारूपास आणण्यास ज्यांचे डोंगराएवढे योगदान राहिले, अशा नसिमा हुरजूक यांनीच संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
हा राजीनामा कार्यकारी मंडळाने स्वीकारला आहे. त्यामुळे या संस्थेशी गेल्या ३६ वर्षांपासून असलेली त्यांची नाळ आता कायमची तुटली आहे. संस्थेचे उपाध्यक्ष पी. डी. देशपांडे यांच्याकडे तूर्त अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.कर्मयोगी बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्णांचे जीवन बदलण्यासाठी उभारलेल्या ह्यआनंदवनह्ण संस्थेतील कौटुंबिक वर्चस्ववादाचे प्रकरण चर्चेत आले असतानाच महाराष्ट्रातील तितक्याच चांगल्या ह्यहेल्पर्सह्णसारख्या अपंगांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या संस्थेतील वादामागेही काहीअंशी वर्चस्ववादाचीही किनार आहे.
वार्षिक साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल, सव्वादोनशे अपंग बांधव राहू शकतील अशी उत्तम वसतिगृहे, सेमी-मराठीची माध्यमिक शाळा आणि वर्षाला किमान चार कोटी रुपयांच्या काजूवर प्रक्रिया करणारा स्वप्ननगरी (मोरे-वाडोस, ता. कुडाळ) येथील प्रकल्प एवढा संस्थेचा पसारा आहे. त्याच्या उभारणीत हुरजूक यांचे योगदान वादातीत आहे किंबहुना हुरजूक म्हणजेच हेल्पर्स अशीच या संस्थेची ओळख आहे.
संस्थेच्या उभारणीत हुरजूक यांच्याइतकेच दिवंगत रजनी करकरे-देशपांडे, मनोहर देशभ्रतार, पी. डी. देशपांडे, श्रीकांत केकडे यांचेही महत्त्वपूर्ण योगदान राहिले; परंतु ही मंडळी कायमच हुरजूक यांची सावली बनून राहिली व संस्थेची मुख्य ओळखही हुरजूक याच राहिल्या.
बाबूकाका दिवाण यांची मुख्य प्रेरणा होती. दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांच्या मातोश्री विजयमाला या संस्थेच्या पहिल्या अध्यक्षा. त्यांचेही संस्था उभारणीत सहकार्य होते. संस्थेच्या स्थापनेपासून विश्वस्त मंडळामध्ये हुरजूक यांच्या कुटुंबातील तीन सदस्य कायमपणे राहिले आहेत. गेल्या वर्षी त्यास विरोधाचे तोंड फुटले व विश्वस्त मंडळामध्ये कुणाच्याच कुटुंबातील अन्य सदस्यांना घ्यायचे नाही, असा निर्णय झाला व त्यानुसार हुरजूक यांचे भाऊ व बहिणीचे पती यांना पायउतार व्हावे लागले.
हुरजूक स्वत: अध्यक्षा व स्वप्ननगरी प्रकल्पाच्या प्रमुख, त्यांचे भाऊ संस्थेच्या गॅस एजन्सीचे प्रमुख, बहीण वसतिगृहाच्या प्रमुख व बहिणीचे पती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आजही सेवेत आहेत. साऱ्याच हुरजूक कुटुंबीयांचे संस्थेसाठी भरीव योगदान राहिले, याबद्दल कुणाचेच दुमत नाही; परंतु म्हणून ही संस्था म्हणजे भविष्यात एका कुटुंबाची खासगी मालमत्ता होऊ नये, नव्या विश्वस्त मंडळाने संस्थेच्या वाटचालीत पुढाकार घ्यावा, असा आग्रह सुरू झाल्यावर त्यातून मतभेदांचे धुमारे फुटले.
या वादाला गेल्या चार वर्षांपासून सुप्त स्वरूपात सुरुवात झाली. गेल्या वर्षी जूनमध्ये संस्थेच्या इतिहासात प्रथमच गुप्त मतदान होऊन विश्वस्त मंडळ नियुक्त केले गेले; परंतु गंमत म्हणजे त्या वेळेच्या जनरल बॉडी सदस्यांनी हुरजूक यांनाच सर्वाधिक मतांनी निवडून दिले आहे.स्वप्ननगरी येथील काजू प्रकल्पात गेल्या चार वर्षांत एक कोटी ६२ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. त्यामुळे कारखान्याचे वाढीव बांधकाम थांबवून यंदा कोरोनामुळे ५० टन काजू प्रक्रिया केली जावी, असे विश्वस्त मंडळाचे म्हणणे होते.
माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू फक्त अपंग पुनर्वसन आहे. पूर्ण आयुष्य मी पैशाच्या स्वरूपात नफा-तोटा न मोजता अपंग पुनर्वसनाच्या कार्याच्या स्वरूपात नफा-तोटा मोजत आले आहे व संस्थेला प्रचंड नफा झालेला आहे; परंतु नवीन विचारसरणीच्या विश्वस्तांच्या मते संस्थेला तोटा झाला आहे.
संस्थेने अवलंबिलेल्या या नव्या कार्यपद्धतीशी व ध्येयधोरणांशी सहमत नसल्याने संस्थेच्या तिन्ही पदांचे राजीनामे देत असल्याचे हुरजूक यांनी म्हटले आहे. त्यांनी १६ जूनला दिलेला राजीनामा विश्वस्त मंडळाने २७ जूनला मंजूर केला आहे. (पूर्वार्ध)
वादाची ही आहेत ठळक कारणेसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वप्ननगरी प्रकल्पामध्ये झालेला तोटा, काही व्यक्तींकडून तिथे झालेला गैरव्यवहार, हुरजूक यांच्या कुुटुंबातील व्यक्तींना विश्वस्त मंडळावरून दूर करणे आणि सध्याच्या विश्वस्त मंडळामध्ये त्या एकाकी पडणे ही नसिमा हुरजूक यांच्या राजीनाम्यामागील प्रमुख कारणे दिसतात.