विश्वास पाटीलकोल्हापूर : हेल्पर्स ऑफ दि हॅण्डीकॅप्ड या संस्थेतून बाहेर पडल्यानंतर अपंग कल्याणाच्या तळमळीतून डॉ. नसिमा हुरजूक यांनी वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी नवीन संस्था उभारणीचे पाऊल उचलले आहे. त्यांनी साहस डिसॲबिलिटी रिसर्च ॲण्ड केअर फाउण्डेशन संस्थेची स्थापना केली असून, त्याचे उद्घाटन येत्या शनिवारी दुपारी ४ वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात होत आहे.
शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते व पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होईल.वयाच्या सोळाव्या वर्षी पक्षाघातामुळे कंबरेखालील भागास अपंगत्व आल्यावर त्या जिद्दीने शिकल्या. अबकारी खात्यात नोकरी केली व १९८४ ला स्वेच्छानिवृत्ती घेऊन बाबूकाका दिवाण या गुरूंकडून प्रेरणा घेऊन रजनीताई करकरे या मैत्रिणीच्या सोबतीने हेल्पर्सचा पाया घातला.
या संस्थेशी तब्बल ३६ वर्षे त्या जोडल्या गेल्या होत्या. हेल्पर्स म्हणजेच नसिमा हुरजूक अशीच त्यांची व संस्थेचीही ओळख बनली होती. संस्थेच्या कोकणातील स्वप्ननगरी प्रकल्पास निधी देण्यावरून हुरजूक व अन्य पदाधिकारी यांच्यात वाद झाला.
या प्रकल्पामध्ये एक कोटी ६२ लाख रुपयांचा तोटा झाला आहे, तरीही हा प्रकल्प अपंगांच्या पुनर्वसनाचा विचार करून पुढे चालू ठेवावा व त्यास हेल्पर्स संस्थेने निधीपुरवठा करावा, असा हुरजूक यांचा आग्रह होता. तसे घडले नाही म्हणून त्यांनी गतवर्षी ६ जूनला राजीनामा दिला व तो विश्वस्त मंडळाने २७ जूनला स्वीकारला. त्यास ३० ऑगस्टला झालेल्या वार्षिक सभेत मंजुरी देऊन विश्वस्त मंडळाची पुनर्रचना करण्यासाठी नवीन कार्यकारी मंडळ स्थापन करण्यात आले.
हुरजूक यांनी हेल्पर्समधून बाहेर पडतानाच अपंगांसाठी काम करत राहण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यानुसार त्यांनी चार-पाच महिन्यांतच नव्या संस्थेची उभारणी केली आहे. या क्षेत्रातील कामाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांची स्वत:चीही चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे या संस्थेलाही त्या नावारूपाला आणतील, असा विश्वास बाळगायला हरकत नाही.नवे विश्वस्त मंडळडॉ. नसिमा हुरजूक (अध्यक्षा), अभिषेक मोहिते (उपाध्यक्ष), तेज घाटगे (सचिव), अजीज हुरजूक (खजानिस), विश्वस्त सर्वश्री साताराम पाटील, जयप्रकाश छाब्रा, अशकीन आजरेकर, भारती दलाल, ॲड. नकुल पार्सेकर, सुधीर पाटील, भरतकुमार शाह.
संस्थेचे नोंदणीकृत कार्यालय हुरजूक यांच्या ताराबाई पार्कातील नशेमन बंगल्यातच सुरू करण्यात येणार आहे. संस्थेवर विविध क्षेत्रांतील मान्यवरांना संधी दिली असून, साताराम पाटील व अजीज हुरजूक हे त्यांचे हेल्पर्समधील जुने सहकारी आहेत.