कोल्हापूर : वास्तुकला (आर्किटेक्चर) पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दरवर्षी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्यावतीने नँशनल अँप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (नाटा) परीक्षा दोनवेळा घेतली जाते. यंदा दि. १ ऑगस्टला आयोजित केलेली पहिली परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आता दि. २९ ऑगस्टला होणार आहे. दुसऱ्या परीक्षेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.देशभरात आर्किटेक्चरची ५०० कॉलेज असून, तेथील एकूण प्रवेश जागा ३० हजार इतक्या आहेत. या जागावरील प्रवेशासाठी कौन्सिलच्यावतीने दरवर्षी नाटाचे आयोजन केले जाते. त्यात ड्रॉईंग आणि सामान्यज्ञान, बुध्दिमत्ता चाचणीवर आधारित दोन पेपर घेतले जातात. ड्रॉईंग काढून विद्यार्थ्यांना त्याचे छायाचित्र ऑनलाईन अपलोड करावे लागत होते. दुसरा पेपर हा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा असतो. यावर्षी कोरोनामुळे परीक्षेच्या वेळापत्रकाबरोबर पहिल्या पेपरच्या स्वरूपात बदल झाला आहे.
या पेपरमध्ये ड्रॉईंग काढायचे नाही, तर कौन्सिलने दिलेल्या ड्रॉईंगवर पसंतीक्रम पध्दतीने उत्तर नोंदवायचे आहेत. या परीक्षांसाठी आतापर्यंत सुमारे ४५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. लॉकडाऊन अथवा काही कारणास्तव ज्या विद्यार्थ्यांना नोंदणी करता आलेली नाही. त्यांच्यासाठी कौन्सिलने सध्या पुन्हा नोंदणी सुरू केली आहे. त्यामुळे परीक्षा देण्याची संधी उपलब्ध झाली आहे.बदललेले स्वरूप विद्यार्थ्यांसाठी सोपेया परीक्षेतील पहिल्या पेपरचे बदललेले स्वरूप विद्यार्थ्यांसाठी सोपे ठरणारे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कौन्सिल परीक्षेबाबत घेतलेला निर्णय योग्य असल्याचे डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे आर्किटेक्चर विभागाचे अधिष्ठाता प्रा. आर. जी. सावंत यांनी सोमवारी सांगितले. राज्यातील १३० आर्किटेक्चर कॉलेजमध्ये एकत्रितपणे आठ हजार जागा आहेत. त्यासाठी गेल्यावर्षी साधारणतः १५ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सध्या परीक्षेसाठी कौन्सिलकडून नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय विद्यार्थी हिताचा आहे. परीक्षा होणार हे देखील महत्त्वाचे आहे. परीक्षा पुढे गेल्याने मिळालेल्या वेळेत विद्यार्थ्यांनी अभ्यासावर भर द्यावा.-प्रा. इंद्रजित जाधव, आर्किटेक्चर विभागप्रमुख, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
गेल्या वर्षीची आकडेवारी दृष्टिक्षेपात
- परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी -४९३९०
- परीक्षा दिलेले विद्यार्थी-४४,२६५
- प्रवेशासाठी पात्र ठरलेले विद्यार्थी-३०,५६०