सातारा : सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रगीताचा अवमान केल्याच्या आरोपावरून नगराध्यक्षा माधवी कदम यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपच्या नगरसेविकेने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत माहिती अशी की, पालिकेच्या दि. २ नोव्हेंबर २०१७ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत तत्कालीन आरोग्य सभापती वसंत लेवे व विरोधी पक्षनेते अशोक मोने यांच्यात धक्काबुक्की झाली होती. सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये भांडणे सुरू असताना नगराध्यक्षा माधवी कदम यांनी राष्ट्रगीत सुरू करण्याच्या सूचना कर्मचाºयांना दिल्या होत्या.
त्यानंतर अशोक मोने यांनी वसंत लेवे यांच्यावर तर वसंत लेवे यांनी अशोक मोनेंवर राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे नगराध्यक्षा माधवी कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
पोलिसांनी भाजपने केलेल्या तक्रार अर्जावरून पहिल्या गुन्ह्याच्या मूळ कागदपत्रात ही तक्रार वर्ग करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजपच्या नगरसेविकेने तक्रार दिली होती. पोलिसांनी पालिकेच्या सभागृहातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास केला. अद्यापही पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, आणखी कोणाची नावे आहेत का? याचीही पोलिस चौकशी करत आहेत.