कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग, कोल्हापूर विभागाच्या कार्यकारी अभियंतापदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविलेले वाय. जी. लवटे यांनी तो नाकारला. त्यांच्या जागी सोलापूर उपविभागातील उपअभियंता अ. ल. भोसले यांच्याकडे हा कार्यभार सोपविल्याचे आदेश गुरुवारी सायंकाळी सहायक मुख्य अभियंता स. रा. पुरी यांनी दिले. त्यामुळे पर्यायी शिवाजी पुलाच्या कामाचे काम आता भोसले यांच्या नियंत्रणाखाली होणार असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, भोसले हे सोमवारी (दि. ११) हा नवा कार्यभार स्वीकारणार आहेत.पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाचा प्रश्न भलताच गाजत आहे. हे पुलाचे काम पूर्णत्वाकडे जात असताना अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत; पण या पुलाप्रश्नी प्रारंभपासून वादग्रस्त बनलेले व कृती समितीने बदलीची मागणी केलेले उपअभियंता संपत आबदार मात्र आहे त्याच ठिकाणी राहिले; तर पुलाच्या कामाला गती दिलेले कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांची पुणे येथे बदली झाली. त्यांच्या ठिकाणी सोलापूर उपविभागातील कार्यकारी अभियंता वाय. जी. लवटे यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिला होता.दरम्यान, लवटे हे दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात येऊन येथील परिस्थितीची पाहणी करून गेले; पण त्यानंतर वैयक्तिक अडचण पुढे करून कोल्हापुरातील कार्यभार स्वीकारणार नसल्याचे वरिष्ठ कार्यालयास पत्राद्वारे कळविले.
त्यामुळे पर्यायी शिवाजी पुलाच्या कामांसाठी सक्षम अधिकाऱ्याकडे कार्यभार सुपूर्द करणे आवश्यक आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग, सोलापूर उपविभागातील उपअभियंता अ. ल. भोसले यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात येत असल्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याबाबतचा आदेश कोकण भवनचे सहायक मुख्य अभियंता स. रा. पुरी यांनी सायंकाळी दिले.