कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती संचलित जरगनगर येथील श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर या शाळेची यशोगाथा शासनाच्या नॅशनल पोर्टलवर झळकणार आहे. महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबादकडून शाळेची विशेष दखल घेण्यात आली आहे.जरग विद्यामंदिर, जरगनगर या शाळेने विविध स्पर्धा परीक्षांत नेत्रदीपक यश मिळवून नावलौकिक मिळविलेला आहे. शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत दरवर्षी ३० विद्यार्थी जिल्हा व राज्य गुणवत्ता यादीत आणून, स्वत:च्या ‘जरगनगर पॅटर्न’ची महाराष्ट्रभर ओळख निर्माण केली आहे.अभ्यासाबरोबरच मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर दिल्यामुळे वक्तृत्व, निबंध, नाट्यस्पर्धा, गायन स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा व राज्य स्तरांवर विद्यार्थी चमकत आहेत. जवाहर नवोदय विद्यालय, सातारा सैनिक स्कूलमध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांची निवड होत असून, गतवर्षी पाचव्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा बहुमान शाळेने मिळविलेला आहे.महाराष्ट्रातील पाचवी, तर कोल्हापूर जिल्ह्यातील ही एकमेव शाळा आहे. या सर्व उपक्रमांची विशेष दखल महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद यांनी घेतली असून, शाळेमधील गुणवत्तापूर्ण कार्याची व्हिडिओ डॉक्युमेंटरी बनविण्यात येत आहे. लवकरच शासनाच्या नॅशनल पोर्टलवर जरगनगर विद्यालयाची यशोगाथा पाहायला मिळणार आहे.‘मिपा’च्या संचालिका डॉ. नेहा बी. बेलसरे यांनी महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक, अकोला, गोंदिया व औरंगाबाद या जिल्ह्यांतील प्रत्येकी एक शाळा निवडली असून, कोल्हापुरातील महापालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर, जरगनगर या शाळेची निवड करण्यात आली आहे. या संस्थेकडून कार्यबल गट सदस्य भगवंत पाटील व टीम यशोगाथा तयार करण्याचे काम करीत आहे.पहिल्या दिवशी प्रवेश हाऊसफुल्लशाळेची पटसंख्या आजघडीला प्री-प्रायमरी युनिट ५५० व इयत्ता पहिली ते आठवी १७६० अशी एकूण २३१० वर पोहोचली आहे. गुढीपाडव्याच्या पहिल्याच दिवशी अॅडमिशन हाऊसफुल्लची परंपरा कायम आहे.