कोल्हापूर : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने शनिवारी शहरातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत विद्यार्थी, शिक्षक, तसेच महापालिका कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.बिंदू चौकात नेहरू युवा केंद्राच्या मुलांनी पथनाटय सादर केले. त्यानंतर महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते रॅलीची सुरुवात झाली. रॅली छ. शिवाजी पुतळा, महानगरपालिका, सी. पी. आर. या मार्गावरून दसरा चौक येथे नेण्यात आली.
रॅलीतील सर्वांकडे मतदानाविषयी विविध घोषवाक्यांचे फलक होते. तसेच रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांनी सक्षम करूया युवा व भावी मतदार, मतदार राजा जागा हो-लोकशाहीचा धागा हो, लोकशाही बळकटीकरणासाठी सर्वांचा सहभाग, एकच लक्ष मताचा हक्क, अशा विविध घोषणा देऊन याविषयी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.रॅलीमध्ये उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, करवीरचे तहसीलदार शीतल मुळे, निवडणूक समन्वयक संजय कुंभार, गणेश आवळे, प्रभारी उपायुक्त धनंजय आंधळे, नगरसचिव दिवाकर कारंडे, शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी शंकर यादव यांच्यासह महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालयाकडील कर्मचारी, एन.सी.सी., एन. एस. एस.चे छात्र, शिवाजी विद्यापीठ, केएमसी कॉलेज, न्यु कॉलेज, डी. डी. शिंदे कॉलेज, राजाराम कॉलेज, मेन राजाराम हायस्कूलचे विद्यार्थी, विद्यार्थिंनी, बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.-------------------------------------------------------------------फोटो क्रमांक - २५०१२०२०-कोल-केएमसी - व्होटर रॅलीओळ - कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यावतीने शनिवारी मतदार दिनानिमित्त रॅली काढण्यात आली. या रॅलीत महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी सहभागी झाले.