पन्हाळा : येथील संजीवन नॉलेज सिटीच्या प्रांगणात ६५ व्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेला शनिवारी प्रारंभ झाला. संजीवन शिक्षण समूहाचे संस्थापक पी. आर. भोसले, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्तमल्लिनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. देशभरातील २४ राज्यांतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कुस्तीपटूंचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
उद्घाटनापूर्वीच मुलींच्या ५०, ५५, ५९, ६५ आणि ७२ किलो वजनी गटाच्या कांस्यपदकासाठीच्या लढती शनिवारी झाल्या. यामध्ये ७२ किलो वजनी गटात पंजाबची अनू सरोज आणि लक्ष्मी पांडे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. त्या कांस्यपदकासाठी लढतील. ६५ किलो वजनी गटात पंजाबच्या अमनप्रीत कौर आणि साक्षी दाबास यांनी रोमहर्षक लढतीत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. ५९ किलो गटात तेलंगणाच्या करुणा सोनकू आणि सेहनम मंजिद्रपाल यांनीही प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. ५५ किलो वजनी गटात तेलंगणाच्या शाहेर कुमारी आणि हरियाणाच्या अंजू कुमारी यांनी प्रतिस्पर्ध्यांना अस्मान दाखवित कांस्यपदकाची दावेदारी मजबूत केली. ५० किलो वजनी गटात भाविका पटेल (गुजरात), निलुकुमारी (उत्तर प्रदेश) यांनीही प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. मुलांच्या कांस्यपदकासाठीच्या लढती अद्याप सुरू आहेत.
यावेळी आॅलिम्पिकवीर बंडा पाटील-रेठरेकर, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, पन्हाळ्याच्या नगराध्यक्ष रूपाली धडेल, महाराष्ट्र तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, महादेवराव आडगुळे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, संजीवन समूहाचे सहसचिव एन. आर. भोसले, प्रशिक्षक संभाजी वरुटे, आदी उपस्थित होते.