कोल्हापूर : रोजगार निर्माण करण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक, विद्यार्थी काँग्रेसने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जवाब दो’ मोर्चा काढला. ‘फसव्या भाजप सरकारचा धिक्कार असो’, ‘चले जाव, चले जाव - मोदी सरकार चले जाव’ अशा घोषणा देत पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवकांनी वाढत्या बेरोजगारीचा निषेध केला.
ताराबाई पार्क येथील राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयापासून मोर्चा बेरोजगारीच्या निषेध करणाºया घोषवाक्यांचे फलक घेऊन, घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला. कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या निषेधार्थ शंखध्वनी केला. यावेळी महापौर सरिता मोरे यांनी भाजप सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे देशात बेरोजगारी वाढली आहे. हे चित्र बदलण्यासाठी केंद्र आणि राज्यात सत्ताबदलाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष आर. के. पोवार म्हणाले, या सरकारने युवा पिढीची फसवणूक केली आहे. त्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील तरुणाई ‘राष्ट्रवादी’च्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरली आहे.
या सभेत माजी नगरसेवक आदिल फरास, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले. या आंदोलनात ‘राष्ट्रवादी’चे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, महिला जिल्हाध्यक्ष संगीता खाडे, नगरसेविका जहिदा मुजावर, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष महेंद्र चव्हाण, कल्पेश चौगुले, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, फिरोज सरगूर, रविराज सोनुले, सचिन मुदगल, विद्यार्थी सहभागी झाले.कोल्हापुरात बुधवारी राष्ट्रवादी युवक आणि विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जवाब दो’ मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी सहभागी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवकांनी सरकारचा निषेध केला.