राधानगरी : राधानगरी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने महागाईच्या विरोधात तहसील कार्यालयाजवळ घंटानाद आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील व तालुका अध्यक्ष प्रा. किसन चौगले यांनी या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार उदय गायकवाड यांना दिले. येथील अंबाबाई मंदिरापासून थाळीनाद करीत कार्यकर्ते तहसील कचेरीवर धडकले. यावेळी झालेल्या सभेत बोलताना जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, केंद्रात भाजप सरकार सत्तेत येऊन दीड वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. तर राज्यात सरकार आपला एक वर्षाचा कालावधी पूर्ण करीत आहे. निवडणुकीपूर्वी सरकारमधील नेत्यांनी सत्तेत येताच महागाई कमी करू, असे आश्वासन दिले होते. मात्र दिवसेंदिवस महागाई वाढत असून, सर्वसामान्य जनतेला जगणे अशक्य झाले आहे. तरीही सरकार पोकळ घोषणा करण्यात मग्न आहे. माजी आमदार नामदेवराव भोईटे, तालुका अध्यक्ष प्रा. किसन चौगले यांची भाषणे झाली. यावेळी उपसभापती संगीता कांबळे, तालुका सरचिटणीस राजेंद्र भाटळे, ‘भोगावती’चे संचालक डी. बी. पाटील, महादेव कोथळकर, पांडुरंग डोंगळे, अमर चौगले, नेताजी पाटील, विश्वास पाटील, सर्जेराव पाटील, माजी सभापती संजय कलिकते, शंकरराव डोंगळे, भिकाजी एकल, अनुप वागरे, महिला अध्यक्ष संजीवनी कदम, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
राधानगरीत राष्ट्रवादीचा घंटानाद
By admin | Published: October 27, 2015 10:06 PM