कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आम्हाला साेडून गेलेले हे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना आपला ‘विठ्ठल’ म्हणतात हे खरे आहे. शेवटी पवार यांचे व्यक्तिमत्त्व मोठे असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नसता तर आम्हाला मंत्रिपद मिळाले नसते. ठीक आहे, आगामी काळात पक्षाध्यक्ष महाराष्ट्रभर फिरायला लागले की, ते कोणा कोणाचे विठ्ठल राहतात, हे लवकरच कळेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला.प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शुक्रवारी दसरा चौकात पक्षाध्यक्ष शरद पवार यांची होणाऱ्या सभेच्या ठिकाणी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.जयंत पाटील म्हणाले, कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याचे अध्यक्षस्थान शाहू छत्रपती यांनी स्वीकारून शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराला अधिक बळकटी मिळणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे समतेचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रभर पसरेल आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पुरोगामी विचाराला पुष्टी मिळणार आहे.महाराष्ट्रातील ताकदवान पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे, त्याविरोधात राज्यातील जनता संघटित होत आहे. आगामी काळात पक्षाध्यक्ष पवार हे जळगाव, पुण्यासह इतर ठिकाणीही सभा घेऊन आपली भूमिका महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडणार आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, नितीन जांभळे, मदन कारंडे, राेहित पाटील आदी उपस्थित होते.
तलाठी परीक्षेत घोटाळाराज्यात झालेल्या तलाठी परीक्षेत मोठा गोंधळ पाहावयास मिळाला. केवळ गोंधळ नाहीतर घोटाळा झाल्याचा संशय आहे. याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे पाटील यांनी सांगितले.मलीकांच्या अडचणी वाढवायच्या नाहीतराष्ट्रवादीचे नेते नवाब मलीक यांना वैद्यकीय उपचारासाठी दोन महिन्यांसाठी जामीन मिळाला आहे. त्यात राजकारण करून आम्हाला त्यांच्या अडचणी वाढवायच्या नाहीत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.