कोल्हापूर : महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी ताराराणी आघाडीच्यावतीने दाखविली आहे. काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी ‘ताराराणी’च्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ‘ताराराणी’चे नेते आमदार महादेवराव महाडिक यांनी थेट राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधून तशी आॅफर दिली आहे. ताराराणी आघाडीचे २० नगरसेवक राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा देतील, असे महाडिक यांनी सांगितले आहे; पण राष्ट्रवादी काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे. महापालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही. हे अगोदरपासूनच स्पष्ट होते; पण निवडणुकीत कोणता पक्ष सर्वांत पुढे असेल याबाबत तर्क-वितर्क लढविले जात होते. भाजप-ताराराणी आघाडी ३० जागांपर्यंत जाईल, असाच सर्वांचा अंदाज होता; पण सत्ता दोन्ही काँग्रेसच स्थापन करणार हे नक्की होते. निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप-ताराराणी व काँग्रेस हे दोघेच सत्तेच्या जवळ पोहोचले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ‘किंगमेकर’ ठरले आहे. भाजप-ताराराणी आघाडीला सत्तेपर्यंत जाण्यासाठी ८ नगरसेवकांची गरज आहे. राष्ट्रवादीकडे १४ नगरसेवक आहेत, पण राष्ट्रवादी भाजप-ताराराणी सोबत येणार नाही. त्यामुळे ‘ताराराणी’च्या २० नगरसेवकांचा राष्ट्रवादीलाच बाहेरून पाठिंबा देऊन काँग्रेसला पर्यायाने सतेज पाटील यांना सत्तेपासून बाजूला ठेवण्याची रणनीती ‘ताराराणी’च्या नेत्यांनी आखली आहे. निकालानंतर ताराराणीचे नेते आमदार महादेवराव महाडिक यांनी आमदार हसन मुश्रीफ यांना फोन करून बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे; पण याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने सावध भूमिका घेत सत्तेत जाण्यासाठी काँग्रेससोबत चर्चा सुरू केली आहे. नूतन नगरसेवकांची आज बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन नगरसेवकांची आज, मंगळवारी सकाळी अकरा वाजता पक्षाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात बैठक होणार आहे. त्यामध्ये नगरसेवकांची मते आजमावून घेऊन काँग्रेससोबत आघाडीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या निकालानंतर ‘ताराराणी’च्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधून सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे; पण याबाबत अद्याप आम्ही काहीच निर्णय घेतलेला नाही. - हसन मुश्रीफ, आमदार
‘ताराराणी’ची राष्ट्रवादी काँग्रेसला आॅफर
By admin | Published: November 03, 2015 12:17 AM