कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार कृष्णराव परशुराम तथा के. पी. पाटील यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. निवडीची औपचारिक घोषणा येत्या चार दिवसांत करण्यात येणार असून जिल्हा कार्यकारिणीसह तालुकाध्यक्ष व विधानसभाध्यक्षांच्या निवडीची अधिकृत घोषणाही केली जाणार आहे. राष्ट्रवादीच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात बुधवारी पक्षनिरीक्षक दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारणीची बैठकीत जिल्हाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांना आवाहन केल्यानंतर कोणीच पुढे आले नाही. त्यानंतर के. पी. पाटील म्हणाले, पक्षाने जबाबदारी सोपविल्यानंतर माझ्या कुवतीप्रमाणे पक्षाचे प्रामाणिक काम केले. काही उणीवा, त्रुटी असू शकतात, कार्यकर्ते कळत-नकळत दुखावलेले असतील तर त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. विधानसभा निवडणुकीत माझा मोठ्या फरकाने पराभव झाल्याने नैतिकता म्हणून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, पण पक्षाने तो स्वीकारलेला नाही. आज नवीन निवड होत आहे, यातून मला मुक्त करा, नवीन सक्षम नेत्यावर जबाबदारी द्या, त्यांच्या मागे पूर्ण ताकदीने उभा राहू. पक्ष मजबूत करण्यासाठी पूर्ण क्षमतेने नवीन जिल्हाध्यक्षाला साथ देईन पण माझ्या नावाचा विचार करू नका, अशी विनंती त्यांनी पक्षनिरीक्षकांकडे केली. आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, पक्षाकडे सध्या तरी जिल्हाध्यक्षपदासाठी सक्षम नेता नाही, तोपर्यंत के. पी. पाटील यांनीच ही जबाबदारी घ्यावी, सक्षम नेता मिळाल्यानंतर दुसरा जिल्हाध्यक्षांचा विचार करूया. दिलीप पाटील म्हणाले, जिल्हाध्यक्षांसह कोणत्याही निवडीची घोषणा येथे केली जाणार नाही. आज झालेला सभेचा अहवाल प्रदेशकडे पाठवून तेथून निवड जाहीर केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदी ‘के. पी.’ बिनविरोध
By admin | Published: April 16, 2015 12:36 AM